मास्क लावून सोनसाखळी चोरणारे अट्टल गुन्हेगार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 08:30 PM2020-04-02T20:30:56+5:302020-04-02T20:32:01+5:30
मास्क लावून साेनसाखळी चाेरणाऱ्यांना पाेलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पुणे : तोंडाला मास्क, हात रुमाल लावून सकाळी सकाळी फिरायला बाहेर पडणार्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणार्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. भारत ऊर्फ सोनू मनोहर चावरे (वय २८, रा. आदर्शनगर, देहुरोड, मुळ रा. पिंपळगाव, निफाड, नाशिक) आणि एसबीर नरेश चौहान (वय २८, रा. देहुरोड, मुळे कर्जत, जि. रायगड) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून खडकी, भोसरी, पिंपरी असे ३ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले दागिने व दुचाकी असा २ लाख २३ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
उषा जवाजिवार (वय ७०, रा. जुना खडकी बाजार) या १८ मार्च रोजी सकाळी मैत्रिणीसह दुध व भाजीपाला आणण्यासाठी चौपाटीकडे जात होत्या. यावेळी सकाळी पावणे आठ वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघंंनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हा घडला, त्या ठिकाणापासून काही अंतरावरील सीसीटीव्हीमध्ये हे दोघे संशयित कैद झाले होते. त्या आधारे पोलीस नाईक किरण घुटे, काँस्टेबल संदीप गायकवाड, अनिरुद्ध सोनवणे, गणेश चिमटे यांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी होळकर पुलावर त्यांना सापळा रचून पकडले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी, सहायक पोलिस फौजदार तापकीर, ठोकळ, पोलिस कर्मचारी सावंत, पवार, लोखंडे, घुटे, कराळे, गायकवाड, सोनवणे, चेमटे यांनी ही कारवाई केली.
हे दोघे जण देहुरोड परिसरातील राहणारे आहेत. ते तेथून पहाटे ५ वाजताचे निघत. मोटारसायकलवरुन रोडला आल्यावर नंबर प्लेट उलटी लावायची व ज्या ठिकाणी चैन स्रैचिंग करायची आहे, त्या ठिकाणी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोहोचून ते तेथील रेकी करीत व चोरी करत त्यानंतर ते दुसर्या दिशेने व लहान लहान रस्त्याने पळून जात असत.
भारत चावरे हा श्रीरामपूर येथील २०१५ च्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे़ त्यांच्याविरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्यासह साथीदारांवर संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यात तो फरार होता.