इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:00 PM2021-05-13T22:00:41+5:302021-05-13T22:00:54+5:30
आरोपी फुड ऑफिसर, इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक करत होता.
पुणे : औरंगाबाद येथील ज्वेलर्स दुकानाला सील करण्याची ऑर्डर आली असल्याचे सांगून पुण्यातील एका ज्वेलर्सला फसविण्याचा प्रयत्न केलेल्या तोतया इन्कमटॅक्स ऑफिसरला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
राहुल सराटे (रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शशांक पुणेकर यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सराटे याने आपण इन्कमटॅक्स ऑफिसर राजेंद्र कदम बोलतो, असे सांगून त्यांच्या अक्षदा ज्वेलर्स या दुकानातून एका महिलेने कमी प्रतिचे सोने दिल्याची तक्रार केली असून दुकान सील करण्याची ऑर्डर आली आहे, असे सांगून ही कारवाई रद्द करायची असल्याचे गुगल पे अकाऊंटवर ३७ हजार २०० रुपये पाठवा, असे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने वापरलेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रिक विश्लेषण केल्यावर राहुल सराटे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. त्याला चेंबूरहून अटक करण्यात आली.
सराटे याने फुड ऑफिसर, इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वेळप्रसंगी तो स्वत:च स्त्रीचा आवाज काढून जीएसटी ऑफिसर असल्याची बतावणी करुन फसवत असे. त्याच्याविरुद्ध अंधेरी, बंगलोर सिटी, चेंबूर, डीसीबी, सीआयडी, लष्कर पोलीस ठाण्यात २०१६ पासून गुन्हे दाखल आहेत. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर परिसरात राहणार्या इतर १० व्यावसायिकांची त्याने फसवणूक केली असून त्याचा तपास सुरु आहे.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.