मुंबईकडे पळत निघालेल्या तरुणांना पाेलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:56 PM2019-02-07T18:56:37+5:302019-02-07T18:58:08+5:30
पोलीस भरतीचे बदललेले निकष मागे घेऊन पूर्वीच्या निकषांवर भरती करावी या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेल्या तरुणांना पोलिसांनी खडकी भागात ताब्यात घेतले.
पुणे : पोलीस भरतीचे बदललेले निकष मागे घेऊन पूर्वीच्या निकषांवर भरती करावी या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेल्या तरुणांना पोलिसांनी खडकी भागात ताब्यात घेतले. या तरुणांना पुण्यातील सणस मैदान येथे आणून सोडण्यात आले.
पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला हाेता. यात माेठ्याप्रमाणावर तरुणांबराेबरच तरुणी देखील सहभागी झाल्या हाेत्या. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे पत्र देण्यात आले. त्यानंतर या आंदाेलकांमधील काही तरुण मुंबईला पळत निघाले हाेते. 11 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात ते पाेहाेचणार हाेते. या माध्यमातून हे तरुण शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे यातून या तरुणांना दाखवून द्यायचे हाेते.
परंतु पाेलिसांनी या तरुणांना खडकी भागात ताब्यात घेतले. त्यांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करण्यात आले. या तरुणांना ताब्यात घेऊन पुण्यातील सणस मैदान येथे आणून साेडण्यात आले. दरम्यान सरकार आंदाेलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप तरुणांनी केला आहे.