होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या शोधासाठी पोलिसांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:21 AM2021-03-04T04:21:09+5:302021-03-04T04:21:09+5:30
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक संशयित खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन कोरोना तपासणी करीत आहेत़ परंतु, ही ...
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक संशयित खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन कोरोना तपासणी करीत आहेत़ परंतु, ही तपासणी करताना आपले संपर्क क्रमांक व पत्ते चुकीचे देत असल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे अशा कोरोनाबाधितांना शोधण्यासाठी आता महापालिकेने थेट पोलिसांचे दार ठोठावले असून, खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा शोध यापुढे पोलिसांकडून होणार आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून खोटी माहिती देणाऱ्या २० कोरोनाबाधितांची यादी पोलिसांकडे सुपूर्त केली आहे़ कोरोनाबाधितांपैकी अनेक जण हे सद्य:स्थितीला घरीच विलगीकरणात (होम आयसोलेशन)चा पर्याय स्वीकारत आहेत़ अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती स्वत:हून कोरोनाची तपासणी करतात़ मात्र, ही तपासणी करताना आपण कोरोना पॉझिटिव्ह आलो, तर ते इतरांना कळू नये म्हणून, स्वत:चे पत्ते, मोबाईल क्रमांक खोटे देत आहेत. दरम्यान अशा प्रवृत्तीमुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे़
या पार्श्वभूमीवर महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना ज्यांचे क्रमांक चुकीचे असतील अशांबाबत थेट पोलीस यंत्रणेला कळवून, इतर कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्ती शोधून त्यांच्यापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी प्राधान्य दिले आहे़ आजमितीला शहरात कोरोनाचे पाच हजार ५५१ सक्रिय रुग्ण असून, यापैकी ऑक्सिजनसह उपचार घेणारे ६३० तर गंभीर २८१ रुग्ण वगळता बहुतांशी रुग्ण हे होम आयसोलेशनमध्येच आहेत़