पोलीस भरतीच्या ठिकाणी औरंगाबादचा पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 10:34 PM2018-03-29T22:34:54+5:302018-03-29T22:34:54+5:30
पोलीस शिपाईपदासाठी सध्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात उमेदवारांच्या शारिरीक चाचणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतरांना येण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असताना गुरुवारी सकाळी पोलिसांना एक संशयित तरुण तेथे रेंगाळताना आढळून आला.
पुणे : पोलीस शिपाईपदासाठी सध्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात उमेदवारांच्या शारिरीक चाचणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतरांना येण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असताना गुरुवारी सकाळी पोलिसांना एक संशयित तरुण तेथे रेंगाळताना आढळून आला. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केल्यावर तो चक्क औरंगाबाद पोलीस दलात शिपाई असल्याचे आढळून आले. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो इथे का आल्याबाबत चौकशी केली. पण त्याच्याकडून कोणताही गुन्हा घडला नसल्याने त्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले.
पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारे गैरमार्गाचा वापर होऊ नये, यासाठी ही परीक्षा पद्धत अतिशय पारदर्शक ठेवण्यात आली आहे. कोणी अशा प्रकारे गैरमार्गाचा अवलंब करीत असेल, तर त्याची माहिती कळविल्यास त्यांना बक्षीस देण्याचे जाहीर आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाने केले आहे. पुणे पोलीस दलात शिपाईपदाच्या भरतीसाठी सुमारे ४६ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सध्या दररोज अडीच हजार जणांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे.
यात कोणाला गैरप्रकारास वाव राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. असे असताना भरतीच्या ठिकाणी पोलीस आढळल्याने गुरुवारी एकच चर्चेचा विषय झाला होता. याबाबत पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यात राहणारा व औरंगाबाद पोलीस दलातील एक पोलीस शिपाई भरतीच्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला सोडून देण्यात आले.