महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:32 PM2018-06-02T21:32:26+5:302018-06-02T21:32:26+5:30

सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावरून राग येऊन पोलीसाने त्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली.

Police beat up security guards in municipal corporation | महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण 

महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण 

Next
ठळक मुद्देवरिष्ठांच्या मध्यस्थीने पाडला पडदासुरक्षा रक्षकांमध्ये याबद्धल तीव्र नाराजीची भावना

पुणे: महापालिकेत नियुक्त पोलिसांनी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. चार सुरक्षा रक्षकांना पोलीस चौकीत नेण्यात आले होते, मात्र त्यानंतर वरिष्ठांच्या मध्यस्थीने याविषयावर पडदा टाकण्यात आला. मात्र सुरक्षा रक्षकांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून अशी मारहाण एखाद्या अधिकाऱ्याला झाली असती तर असेच मिटवण्यात आले असते का अशी विचारणा होत आहे. 
महापालिकेची सर्व प्रवेशद्वारे बंद करून आता एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. तिथे नाव,पत्ता नोंद करून व गेट पास घेऊनच आत यावे लागते. महापालिका इमारतीच्या सुरक्षेवरून गेल्या अनेक महिन्यांपासून ही व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी साध्या वेशातील एक पोलीस शिपाई कसलीही नोंद न करता आतमध्ये येत होते. त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकाने विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण पोलीस आहोत असे सांगितले. त्यावर सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावरून राग येऊन त्यांनी त्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. 
सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राचा आग्रह कायम ठेवल्याने पोलीस शिपाई यांनी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिथे आले व त्यांनीही सुरक्षा रक्षकांना आमच्या माणसांना ओळखपत्र मागता का म्हणून झापले. एवढेच नाही तर यांना चौकीत घेऊन चला असे सांगत तीन सुरक्षा रक्षकांना पोलीस चौकीत नेले. त्यांना तिथेही मारहाण केली असल्याचे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्य सुरक्षा रक्षक लगेचच काम थांबवून तिथे आले. त्यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली व तीन सुरक्षा रक्षकांना चौकीत नेले असल्याची माहिती दिली. 
त्यानंतर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तिथे आले. त्यांनी चौकीत जाऊन प्रकरण मिटवले. सुरक्षा रक्षकांनाही परत आणण्यात आले. फिर्याद करणे वगैरे बाजूलाच राहिले, उलट सुरक्षा रक्षकांनाच कोणालाही कसे ओळखपत्र मागता म्हणून झापण्यात आले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये याबद्धल तीव्र नाराजीची भावना आहे. एखाद्या अधिकाऱ्याला अशी मारहाण झाली असती तर प्रकरण असेच मिटवण्यात आले असते का अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. 
...............
बहुतेक सुरक्षा रक्षक ठेकेदार कंपनीकडून घेतलेले आहेत. अत्यंत कमी वेतनावर ते काम करत असतात. त्यांना कसल्याही सुविधा नाहीत. नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, नागरिक यांच्याकडून त्यांना सतत बोलणी खावी लागतात. नगरसेवकांबरोबर रोज अनेक कार्यकर्ते वाहन घेऊन येतात व कुठेही कसेही लावतात. सुरक्षा रक्षक काही बोलले तर त्यांच्याशी हुज्जत घालतात. अशा प्रकारांमध्ये वाढ होत असून त्यात प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.  
 

Web Title: Police beat up security guards in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.