राजगुरुनगर : रिंगरोड प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:22 PM2022-04-08T18:22:12+5:302022-04-08T18:26:28+5:30
या घटनेत पोलिसांनी बावीस जणांना अटक...
राजगुरुनगर : रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी तसेच त्यांच्या पत्नी व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांच्यासह शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात अभूतपूर्व आक्रमक आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर गवारी दांपत्यांना पोलिसांनी कार्यालयातून अक्षरशः फरफटत ओढून नेऊन पिंजरा गाडीत बसवले. या घटनेत पोलिसांनी बावीस जणांना अटक केली.
पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी खेड तालुक्यातील संभाव्य बाधित नऊ गावातील शेतकऱ्यांनी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ८) सुमारे दोन तास आक्रमक आंदोलन केले. जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपातून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी थेट लाठीचार्ज केला. तसेच आंदोलकांना अटक करून गुन्हा दाखल केला.
आंदोलनादरम्यान रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी तसेच त्यांच्या पत्नी व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांना पोलिसांनी फरफटत ओढुन नेऊन पिंजरा गाडीत बसवले. त्यांच्या बरोबर जे शेतकरी हाताला लागतील अशा जवळपास शंभर कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी अटक केली. त्यात महिलांची संख्या मोठी होती. तब्बल दोन तास आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून हा प्रकल्प रद्द करण्याची आक्रमक मागणी केली.
त्यावर प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी समर्पक उत्तर देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शेतकरी घोषणा देत कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नव्हते. अखेर पोलिसांनी अटक करून सर्वांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. असे केल्यावर महिलांनी पोलिसांना अडवले, यावेळी कार्यालयात घोषणाबाजी आणि आरडाओरडा यामुळे गोंधळ निर्माण झाला.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव, उपनिरीक्षक राहुल लाड पोलिस हवालदार संतोष घोलप, संदिप भापकर यांच्यासह मोजका पोलीस फौजफाटा प्रयत्न करीत होते. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तासाभराने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक पाचारण करण्यात आले. त्यानंतर थेट आंदोलकांना उचलुन गाड्यांमध्ये बसवणे आणि जे ऐकणार नाहीत अशांवर लाठीमार सुरू केला. काहीच वेळात सर्व आंदोलकांना बाहेर काढून अटक करण्यात आली.