पोलीस झाले हायटेक; सहकार्याकडून 'फोन पे'द्वारे स्वीकारली लाच, ड्युटी अंमलदार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:12 AM2021-06-29T00:12:53+5:302021-06-29T00:14:05+5:30
सहकाऱ्याकडून स्वीकारली फोन पे द्वारे लाच. प्राथमिक चौकशीतही लाच स्वीकारल्याचं स्पष्ट
पुणे : विनामास्क फिरणार्यांकडून दंड स्वीकारण्यासाठी पुणेपोलिसांनी कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय नव्याने केली आहे. मात्र, त्याअगोदरच आपण हायटेक झालो असल्याचे शहर पोलिसांनी दाखवून दिले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ड्युटी अंमलदाराने आपल्या सहकार्याकडून पे फोनद्वारे लाच स्वीकारल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी या ड्युटी अंमलदाराला निलंबित केले आहे. प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.
पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी अंमलदाराकडे असते. आपल्याला सोयीची ड्युटी लावावी, यासाठी अनेक जण ड्युटी अंमलदाराची मर्जी संभाळण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे लाच द्यावी लागते, हा पोलिसांनमधील नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. वारजे माळवाडी येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे याने एका पोलीस शिपायाला जाणून बुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होते. त्यांना काम शिकायचे असल्यामुळे त्यांनी मजबुरीतून २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पेद्वारे प्रमोद कोकाटे याला लाच दिली.
पोलीस शिपायाने केलेल्या तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पेद्वारे पाठविल्याचे सांगितले. मात्र, कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रमोद कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे.