आठ वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस आरोग्य कर्मचारी बनले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 04:07 PM2020-06-28T16:07:34+5:302020-06-28T16:08:23+5:30
कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाची कारवाई
पुणे: जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गेली ८ वर्षे फरार होता. तो घरी असल्याचे समजल्यावर कोंढवा पोलिसांनी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत सर्व्हेचा बहाणा करुन त्याच्या घरात प्रवेश मिळविला व त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.
योगेश बुद्धीराम माळी (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो जून २०१३ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी कोरोनाचा संसर्गाचा फायदा घेऊन सर्व्हेच्या नावाखाली त्याला पकडण्यात यश मिळविले. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस नाईक कौस्तुभ जाधव यांना योगेश जाधव हा घरी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्याने अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला असल्यामुळे कोंढवा पोलिसांनी यावेळी काळजी घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, हवालदार योगेश कुंभार, गणेश आगम, दीपक क्षीरसागर, सुशील धिवार, मोहन मिसाळ, उमाकांत स्वामी हे पथक महापालिकेचे आरोग्य कर्मचारी बनले. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व्हे करण्याचा बहाणा त्यांनी केला व योगेश याच्या घराबाहेर सापळा लावला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा त्याचे कुटुंबीय घाबरले होते. त्यांची भेदरलेली अवस्था पाहून व आरोपी पूर्वइतिहास लक्षात घेऊन थोडा जरी संशय आल. तर तो पळून जाईल हे लक्षात घेऊन शिंदे यांनी आपण महापालिकेकडून आलो आहे. ते रहात असलेल्या परिसरामध्ये व अवतीभोवती कोरोना पेशंट असल्याची माहिती मिळाली. सर्व्हे करीत आहोत, असे सांगून कुटुंबातील लोकांची माहिती विचारली. घरातील कोणाला ताप, खोकला काही आहे का, सर्वांना समक्ष आणा, असे सांगून तपासणीचे नाटक करीत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कुटुंबियांनी योगेश माळी याला समोर आणले. तो आपल्या टप्प्यात असल्याचे लक्षात आल्यावर शिंदे यांनी व बरोबरच्या कर्मचार्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.