Police Bharti | पोलिस भरती मैदानी चाचणी ‘मेरिट’ लावताना शासन निर्णयांचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 02:30 PM2023-03-25T14:30:45+5:302023-03-25T14:31:13+5:30
महाराष्ट्र पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लावलेल्या मेरिटवरूरुन ही बाब समोर आली आहे...
बारामती (पुणे) : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची मैदानी चाचणी झाली आहे. मैदानी चाचणीचे गुणही देण्यात आले आहे. परंतु मैदानी चाचणीचे मेरिट लावताना सामाजिक व समांतर आरक्षणामधील शासन निर्णयांचा व परिपत्रकांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लावलेल्या मेरिटवरूरुन ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, पोलिस पाल्य, होमगार्ड इ. समांतर आरक्षणामधील उमेदवारांना खुल्या सर्वसाधारण गटातील मेरिट इतके गुण मिळाले, तर त्यांना सर्वसाधारण खुल्यागटात समाविष्ट करून घेतल्याचे दिसून आले आहे. पण त्याचवेळी औरंगाबाद लोहमार्गसारख्या युनिटमध्ये या समांतर आरक्षणामधील उमेदवारांना खुल्या सर्वसाधारण गटातील मेरिट इतके गुण मिळूनही त्यांना खुल्या सर्वसाधारण मुलांच्या गटामध्ये घेतले नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद लोहमार्ग या ठिकाणी खुल्या प्रर्वगातील सर्वसाधारण गटाचे मेरिट ४५ लागले आहे. तरीही ५० गुण घेणाऱ्या महिला, ४८ गुण घेणारे खेळाडू व प्रकल्पग्रस्त, तसेच ५० पैकी ५० गुण घेणारे माजी सैनिक यांना सर्वसाधारण खुल्या गटात घेण्यात आले नाही.
शासनाच्या अधिकृत शासन निर्णय व परिपत्रकानुसार सामाजिक व समांतर आरक्षणाचे मेरिट लावल्यास, उमेदवारांना न्याय मिळेल. याबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, एकाच महाराष्ट्रात एकाच प्रकारचे अधिकृत शासन निर्णय असताना दोन वेगवेगळ्या पद्धतीने मेरिट लावण्याची पद्धत सर्वांना आश्चर्य चकित करत आहे. तरी या बाबीकडे गृहमंत्री व संबंधितांनी लक्ष देऊन दुरुस्ती करावी ही अपेक्षा असल्याचे रूपनवर म्हणाले.
...नक्की मेरिट किती लागले
मुंबई वाहन चालक भरतीत वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांचे मैदानी चाचणीचे मेरिट लावले आहे. परंतु उमेदवारांना मिळालेले गुण न लावल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजगी आहे. मुंबई वाहन चालकच नाही, तर महाराष्ट्रातील बहुतांश वाहनचालक जिल्ह्यांचे मैदानी चाचणीतील गुण न लावल्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. नक्की मेरिट किती लागले, मेरिट कसे लावले. याबाबतची कोणतीच माहिती यामुळे मिळत नाही.