पोलीस दर महिन्याला ७० - ८० लाख हप्ते घेतायेत, धंगेकरांचा आरोप तर अंधारेंनी वाचली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:01 PM2024-05-27T14:01:48+5:302024-05-27T14:02:13+5:30
पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? धंगेकरांचा सवाल
पुणे : पुणे अपघात प्रकरणात प्रचंड घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शहरातील सरकारी अधिकाऱ्यांचे अक्षरश धाबे दणाणल्याचे चित्र आहे. पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. आता या प्रकरणातून अग्रवालकडून पैसे घेणाऱ्यांची नावेही हळूहळू समोर येऊ लागली आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या प्रत्येक मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष वेधून चव्हाट्यावर आणणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांच्याबरॊबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या.
धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावले आहे. पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक यांच्याकडून दर महिन्याला किती हजार, लाख घेतात. चक्क याची यादीच वाचून दाखवली आहे. तुम्ही पाप करताय, खोट बोलू नका असे म्हणत दर महिन्याला ८०, ९० लाख हप्ते घेता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यात धंगेकरांनी पोलिसांची नावेही वाचून दाखवली आहेत.
कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. या सगळ्या प्रकणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाबुत होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बार मध्ये वसुल्या केल्या जात आहे. आमच्या कडे सगळे पुरावे आहे आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. सरकार काही करुद्या आम्ही रस्त्यावर उतणार असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिलाय.
सुषमा अंधारेंनी हप्ता यादीच वाचून दाखवली
सुषमा अंधारे यांनी पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सु अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली. त्यानंतर अधिकार्यांनी या सर्व बाबींची चौकशी केली जाईल असे आश्वासन अंधारे आणि धंगेकरांना दिले आहे.
पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली..
द माफिया - १ लाख रुपये
एजंट जॅक्स - प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी ५० हजार रुपये (१० ते १२ आऊटलेट)
टू बीएचके - १ लाख (राजबहादूर मिल्स)
बॉलर- २ लाख
डिमोरा - १ लाख (राजबहादूर मिल्स)
मिलर - १ लाख
टीटीएम रुफटॉप- ५० हजार (बाणेर)
ब`क स्टेज - ९० हजार
ठिकाणा - दीड लाख
स्काय स्टोरी -५० हजार
जिमी दा ढाबा - ५० हजार (पाषाण)
टोनी दा ढाबा - 50 हजार
आयरिश - ४० हजार
टल्ली टुल्स - ५० हजार
अॅटमोस्पिअर - ६० हजार
रुड लॉर्ड - ६० हजार
२४ के - १ लाख ५० हजार (बालेवाडी)
कोको रिको हॉटेल - ७५ हजार (भुगाव)
स्मोकी बिज हॉटेल - ७५ हजार (भुकुम)
सरोवर हॉटेल - १ लाख (भूगाव)
यासह सनी होरा यांचे १८ हॉटेल, बार, २ वाईन शॉप, ३ बिअर शॉप व अन्य ठाबे - साडेतीन लाख
बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन शॉप, ३५ बिअर शॉप - साडेपाच लाख
कैलास जगताप व अन्य यांचे ११ बार, ८ वाईन शॉप, ९ बिअर शॉप - अडीच लाख
तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला
मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ,केस टाकण्याची भाषा केली. आता त्यांच काय म्हणंण असेल. ललित पाटील यांच्या प्रकरणावेळी आम्ही अजय तावरे यांच नाव घेतलं तेव्हाचं त्यांना अटक करणं गरजेचं होतं. अजय तावरे, संजीव ठाकुर यांच्या अटकेची आम्ही जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला असं आरोप अंधारे यांनी केलाय.