Police Commemoration Day : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बुधवारी श्रद्धांजली; संचलनाद्वारे मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:30 PM2020-10-20T13:30:22+5:302020-10-20T13:38:57+5:30
२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभर पाळला जातो.
पुणे : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात २१ ऑक्टोबर रोजी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करुन त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तसौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभर पाळला जातो.
१ सप्टेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे २६४ पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ पडले.त्यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने, पोलीस निरीक्षक रितेश देवराओजी भोपरे, पोलीस नाईक सुनिल महादेव मेश्राम, पोलीस नाईक शहाजी बाबुराव हजारे, पोलीस शिपाई किशोर लक्ष्मण आत्राम या ५ जवानांचा समावेश आहे.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख भागातील सरहद्दीवर १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी भारतीय जवान गस्त घालत होते. तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालत हॉट स्प्रिंग्जच्या पूर्वेला ६ मैल दूर आली असताना पर्वताच्या डावे बाजूला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या. त्या दिशेने तुकडी जात असताना अचानक भयानक गोळीबार सुरु झाला. त्या ठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने त्याला तोंड दिले.या लढाईत १० शिपायांना वीर मरण आले व ९ जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर हॉट स्प्रिंग्ज येथे सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे १९५९ साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्यावेळी सर्वांनी आमच्या ह्या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन पाळू करु़ अशी शपथ घेतली आणि तेव्हापासून सर्व राज्यातील पोलीस दले या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करुन त्यांना मानवंदना देतात.
पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस स्मृति स्तंभ उभारण्यात आला आहे. तेथे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.