पोलीस आयुक्तालयात पिसाळलेले कुत्रे, अधिकाऱ्यासह चौघांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:47 AM2018-06-01T06:47:06+5:302018-06-01T06:47:06+5:30
पोलीस आयुक्तालयात घुसत एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलीस अधिकाºयासह चौघांचा चावा घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे.
पुणे : पोलीस आयुक्तालयात घुसत एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलीस अधिकाºयासह चौघांचा चावा घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे. या घटनेत गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक, दोन पोलीस कर्मचारी आणि कामानिमित्त आयुक्तालयात आलेल्या शाळेच्या सुरक्षारक्षकाला अशा चौघांना जखमी केले.
जखमी पोलिसांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर, रात्री सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर तत्काळ कुत्र्याला पकडून नेण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा आयुक्तालयात फिरत होता. त्या वेळी आयुक्तालयातील पूर्वीच्या आणि या कुत्र्यांमध्ये जोरदार कळवंडीही झाल्या होत्या. काही कर्मचाºयांनीच या कळवंडही सोडविल्या होत्या. त्यानंतर दुसºयाच दिवशी हा प्रकार घडला आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक विभागातील पोलीस नाईक ठाकरे यांनी प्रकाश निंबाळकर यांना कळविले होते. आयुक्तालयातून फोन आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये निंबाळकर हे पोलीस आयुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले.
आयुक्तालयात नेहमी भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. अनेकांकडून त्यांना खायला दिले जात असल्याने या भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. गुरुवारी त्यातील एकाने आयुक्तालया शेजारील एका शाळेच्या कर्मचाºयाला चावा घेतला. त्यानंतर तो आयुक्तालयात घुसला.