पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर आणि उडाला एकच गोंधळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:16 PM2019-06-03T16:16:17+5:302019-06-03T16:19:22+5:30
शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली.
पुणे : पुण्यात येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी रस्त्यावर उतरून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी न करणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई केली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर ते शास्त्रीनगर चौकातून जात असताना त्यांना हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार आढळले. ते बघून आयुक्त थांबले आणि त्यांनी या चौकात कारवाई सुरु आहे की नाही याविषयी विचारणा केली. त्यावर कारवाई सुरु असल्याचे समजले. त्यानंतर काहीच मिनिटात एक उपनिरीक्षक चौकात आले. तिथे आयुक्तांनी हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर करण्याच्या कारवाईविषयी सूचना दिल्या. त्यानंतर केवळ दहा मिनिटात तब्बल ५१ दुचाकीस्वारांना दंड आकारण्यात आला. काही चालकांच्या गाड्यांच्या चाव्या सिग्नलवर उभे असतानाच काढून त्यांना बाजूला घेऊन कारवाई करण्यात आली . मात्र अचानक सुरु झालेल्या या धडक कारवाईमुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झालेली दिसून आली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे पुरेसे ई-चलन काढण्यासाठी मशीन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी इतर चौकातील मशीन मागवून कारवाई केली.अखेर आयुक्तांचा ताफा तिथून रवाना आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.