आरटीओ एजंटविरोधात पोलिसात तक्रार
By Admin | Published: February 17, 2015 01:11 AM2015-02-17T01:11:35+5:302015-02-17T01:11:35+5:30
दुचाकीच्या नोंदणी पुस्तकावरील (आर.सी. बुक) बँकेचे नाव कमी करण्यासाठी पैशांची मागणी करणारांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सोमवारी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुणे : दुचाकीच्या नोंदणी पुस्तकावरील (आर.सी. बुक) बँकेचे नाव कमी करण्यासाठी पैशांची मागणी करणारांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सोमवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच, कार्यालयाच्या आवारात अनधिकृत काम करताना आढळून आल्यास इतर एजंटांवरही कडक कारवाई करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आरटीओमधील एका एजंटने दोन महिन्यांपूर्वी किरण राठोड यांच्याकडून संबंधित कामासाठी पैसे घेतले होते. याविषयी ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पावले उचलत संबंधित एजंटविरोधात तक्रार घेतली.
तसेच, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बंडगार्डन पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तसेच राठोड यांचे रखडलेले कामही प्रक्रियेनुसार मार्गी लावण्यात आले.
याविषयी बोलताना पाटील म्हणाले, की सहायक अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. संबंधित एजंटाविरोधात कडक पावले उचलली जातील. काही दिवसांपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांकडे आधी अर्ज जमा होतो व नंतरच पैसे भरता येतात. यासाठी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या आवारात मदत कक्षही असल्याने त्या ठिकाणी चौकशी करावी. अनधिकृत काम करणाऱ्या एजंटांविरोधात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एजंटकडून बोगस पीयूसी
४जादा पैशांची मागणी करणाऱ्या एजंटने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रही (पीयूसी) बोगस दिल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीची कसलीही तपासणी न करता त्याने ‘पीयूसी’ दिले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार देण्यात आली आहे. संबंधित एजंटकडून आणखी काही जणांना बोगस पीयूसी देण्यात आल्याची शक्यता आहे. याची दखल घेत जितेंद्र पाटील यांनी सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.