पोलीस बंदोबस्तात उघडले आळेफाटा शाळेचे टाळे
By admin | Published: June 15, 2016 04:55 AM2016-06-15T04:55:36+5:302016-06-15T04:55:36+5:30
शिवछत्रपती नगर विकास संस्थेने आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपयांहून अधिक भाडे थकले होते.
आळेफाटा : शिवछत्रपती नगर विकास संस्थेने आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपयांहून अधिक भाडे थकले होते. भाडे न मिळाल्याने संस्थेने शाळेच्या वर्गखोल्यांना टाळे ठोकले होते. या वर्गखोल्या पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा शाळा बंद ठेवण्यात आली. उद्या १५ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने पोलीस बंदोेबस्तात आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे टाळे उघडण्यात आले.
आळेफाटा येथील शिवछत्रपती नगर विकास संस्थेने गेली १६ हून अधिक वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. एप्रिल २०१२ ते मार्च २०१५ मधील भाड्यापोटी संस्थेला साडेतीन लाख रुपये शिक्षण विभागाने दिले. मात्र, त्यातील थकीत साडेतीन लाख व या शैक्षणिक वर्षाचे भाडे, असे साडेसहा लाखांहून अधिक भाडे अनुदान पाठपुरावा करूनही न मिळाल्याने अखेर संस्थेने वर्गखोल्यांना टाळे ठोकले.
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आज गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, सभापती संगीता वाघ, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव भीमाजी गडगे व संचालक यांची बैठक झाली. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने अखेर विस्तार अधिकाऱ्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात वर्गखोल्या उघडण्याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात हे टाळे आज सायंकाळी खोलण्यात आले. शिक्षणाला आमचा विरोध नसून पाठपुरावा करूनही भाडे वेळेवर मिळत नसल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.