तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:05 PM2020-06-07T22:05:01+5:302020-06-07T22:14:21+5:30
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पोलीस हवालदार लाचखोर निघाला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार विलास तोगे असे याचे नाव आहे. सध्या तो वारजे पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. विलास तोगे याची अगोदर वारजे पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर तेथून पुन्हा वारजे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. आपली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली व्हावी, यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले होते. आईवडिल आजारी आहेत. त्यांना वेळ देता यावा यासाठी बदली करावी, अशी विनंती त्याने केली होती.
त्यासाठी त्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्र जानेवारी महिन्यात मिळवले होते. तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्याला शिफारसपत्र दिले होते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंत्र्याची शिफारस असतानाही त्याची बदली गेल्या ६ महिन्यात केली नाही.
वारजे येथे एका दुकानावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व दुकानदाराचा पोलिसांच्या ताब्यात असलेला डी व्ही आर परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३८ हजार रुपये त्याने अगोदर घेतले. उरलेले १२ हजार रुपये देण्यासाठी तोगे याने दुकानदाराकडे तगादा लावला होता. तेव्हा दुकानदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी केलेल्या पडताळणीत विलास तोगे याने १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे आढळून आले. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ तेव्हापासून विलास तोगे हा फरार आहे. तो कामावरही आलेला नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा शोध घेत आहे.