तीन बायका आणि फजिती ऐका : पोलीस कॉन्स्टेबल निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 08:52 PM2018-05-21T20:52:32+5:302018-05-21T20:52:32+5:30
तीन बायका आणि फजिती ऐका ही म्हण तर अनेकांनी ऐकली असेल. मात्र याच करणामुळे पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित व्हायची वेळआली आहे.
पुणे : तीन बायका आणि फजिती ऐका ही म्हण तर अनेकांनी ऐकली असेल. मात्र याच करणामुळे पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित व्हायची वेळआली आहे.या कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलीस दलाची इभ्रत कमी केल्याच्या कारणावरून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे ३८ वर्षांच्या विजय जाधव यांनी एकूण तीन लग्न केल्याचे समोर आले आहे. मात्र त्याबाबत कल्पना दिल्याने दुसऱ्या बायकोने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी समजलेली माहिती म्हणजे जाधव यांनी पहिल्या लग्नानंतर बायकोशी न पटल्याने तिला सोडून दिले. या संबंधीचा बारामती न्यायालयात त्या संबंधी तीन वर्षांपासून खटला सुरु आहे. हा खटला सुरु असतानाच त्यांनी २४ डिसेंबर २०१६रोजी दुसरे लग्न केले. मात्र पहिल्या लग्नाबद्दल त्यांनी आणि जाधव कुटुंबीयांनी दुसऱ्या बायकोला अंधारात ठेवले. लग्नानंतर काही महिन्यात तिला पहिल्या लग्नाबद्दल समजले. तिने याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केल्यावर तिच्या छळास सुरुवात केली. बराच काळ हा छळ सहन केल्यावर ती माहेरी परतली.
हे सर्व सुरु असताना जाधव यांनी १२डिसेंबर २०१७रोजी तिसरा विवाह केला. त्यांची तिसरी पत्नी खेड तालुक्यातील असून या लग्नासाठी तिच्या कुटुंबियांकडून ५० हजार रुपये इतका हुंडाही घेण्यात आला. या प्रकाराची माहिती दुसऱ्या पत्नीला कळल्यावर तिने ११ एप्रिलला लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामध्ये शारीरिक व मानसिक छळ, गर्भपात कारण्यासाठीची स्थिती निर्माण करणे,बहुपत्नीत्व या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यावर पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला कलंक लावून बेअब्रू केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या सहीखाली निलंबनाचे आदेश काढण्यात आले.