रेमडेसिविरच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:02+5:302021-04-16T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या शहरात रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असताना या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या शहरात रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असताना या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. तो रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 7 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या दोन टोळ्या पकडून 5 आरोपींना युनिट 4 गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णाला उपयुक्त असलेले रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा कोणी काळाबाजार करू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा यांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
बुधवारी (दि.14) गुन्हे शाखा युनिट-4 कडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार गस्त घालत असताना पोलीस हवालदार रमजान शेख यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती वाघोली परिसरात कोरोना आजारावरील उपचारासाठी पुरविण्यात येणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करून 10 हजार रु. किमतीस एक नग या प्रमाणे विक्री करीत आहे. याबाबत औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानुसार रोहिदास बनाजी गोरे (रा. गोरेवस्ती, वाघोली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध श्रृतिका जाधव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी कंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दुस-या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस हवालदार रूपेश वाघमारे यांना डिमेलो पेट्रोलपंप नगर रोडजवळ एक व्यक्ती रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करून 18 हजार रुपये किमतीस एक नग याप्रमाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे एक डमी गि-हाईकाला पाठविले असता मोहम्मद मेहबूब पठाण (वय 28, रा. शालीमार चौक, दौंड) याच्यासह त्याचे तीन साथीदार इम्तीयाज युसूफ अजमेरी (वय 52, रा. 27/1 सुखरेवस्ती, खराडी, चंदननगर, पुणे), परवेज मैनोद्दीन शेख (वय 36, रा. तुकाईनगर, सिध्दटेक रोड, क्रिस्टी चर्चजवळ, दौंड), अश्विन विजय सोळंकी (वय 41, रा. नं.14, वांबुरे बिल्डींग, मेन बाजार, शनिमंदिराजवळ, येरवडा) यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनच्या 2 बॉटल जप्त करण्यात आल्या आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दिनेश खिंवसरा (औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच यापूर्वीही दि.11 एप्रिलला भारती पोलीस स्टेशन हद्दीत दत्तनगर कात्रज याठिकाणी युनिट-1 गुन्हे शाखा यांनी कारवाई करुन एकाला अटक केली असून त्याच्याकडून 1 रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. तर दि.12 एप्रिलला युनिट-3 गुन्हे शाखा यांनी भवानी पेठ पुणे येथे एका व्यक्तीकडून 2 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत, अशा प्रकारे पुणे शहर पोलिसांकडून इंजेक्शनच्या काळाबाजारावर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
-------------- ------------------------------