दौंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; ७८ लाखांचा तब्बल पावणे दोनशे किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 02:54 PM2021-12-26T14:54:55+5:302021-12-26T14:55:16+5:30
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश येथील सात पुरुष आणि पाच महिलांना अटक करण्यात आली आहे
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावणे दोनशे किलो गांजा सह मुद्देमाल असा एकूण ७८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस बस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. याप्रकरणी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश येथील सात पुरुष आणि पाच महिलांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, पुणे येथे विक्रीसाठी दोन ट्रकमधून गांजाच्या पिशव्या नेल्या जात आहेत. साधारणता हे दोन्ही ट्रक मध्यरात्रीच्या सुमारास पाटस परिसरात येणार आहेत. हे समजल्यावर पोलिसांनी पाटस परिसरात सापळा रचला. दोन्ही ट्रकच्या मिळालेल्या नंबरवरून पोलिसांनी पाटस हद्दीत आलेले दोन्ही ट्रक अडवून ताब्यात घेतले. या वेळी त्यांची तपासणी केल्यावर एका ट्रक चालकाच्या केबिनमध्ये गांजाच्या सहा पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये तीस लाख रुपये किंमतीचा पावणे दोनशे किलो गांजा पिशव्या मध्ये होता. ४८ लाख रूपये किंमतीचे गांजा वाहतूक करणारे दोन ट्रक असा एकूण ७८ लाख रुपयांच्या ऐवज यावेळी जप्त करण्यात आला आहे.