चिनी मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:19+5:302021-06-24T04:09:19+5:30
-- बारामती : बारामती शहर पोलिसांनी बुधवारी (दि. २३) चायनीज मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. या वेळी एकूण ...
--
बारामती : बारामती शहर पोलिसांनी बुधवारी (दि. २३) चायनीज मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. या वेळी एकूण ११ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी बारामती शहर पोलीस कर्मचाऱ्यांसह कारवाई केली. पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ नुसार प्लास्टिक नायलॉन सिन्थिटीक मांजाने पक्षी व मनुष्यास होणारे इजा (दुखापत) पासून संरक्षण व्हावे याकरिता संबंधित मांजा जवळ बाळगण्यास त्याचा वापर विक्री करण्यास मनाई आदेश काढले आहेत. तसेच उच्च न्यायालयातर्फे वेळोवेळी मांजा विक्री प्रतिबंधाबाबत निर्देश दिले आहेत. त्यामध्ये प्लास्टिक नायलॉन सिन्थिटीकपासून बनविण्यात येणाऱ्या मांजा वापरास, जवळ बाळगण्यास बंदी घातलेली आहे.
मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबात सूचना दिल्या आहेत. आम्ही जुनी भाजी मंडई येथे पंच व पोलीस स्टाफसह कशिश टेडर्स व तेजस जनरल स्टोअर्स नावाच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मांजा गुंडाळण्याकरिता वापरलेली सिल्वर रंगाची इलेक्ट्रिक दोन मशीन, तसेच मांजाचे १८ बंडल असा एकूण ११ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उमेश दंडीले, पो.कॉ. अजित राऊत, पो.कॉ. दशरथ इंगोले आदींनी ही कारवाई केली.
——————————————————
फोटो ओळी : बारामती शहर पोलिसांनी बुधवारी चायनीज मांजा विक्री करणारे दुकानदारांवर कारवाई केली.
२३०६२०२१-बारामती-१९
————————————————