पोलिसांनी महिलांसाठी बनवले ‘प्रतिसाद अॅप’
By Admin | Published: March 14, 2016 01:11 AM2016-03-14T01:11:12+5:302016-03-14T01:11:12+5:30
पोलिसांनी महिलांच्या तत्काळ मदतीसाठी ‘प्रतिसाद’ अॅप सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर या अॅपची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड स्तरावर केली जाणार आहे.
चिंचवड : पोलिसांनी महिलांच्या तत्काळ मदतीसाठी ‘प्रतिसाद’ अॅप सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर या अॅपची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड स्तरावर केली जाणार आहे. केवळ महिलाच नाही तर संकटसमयी या अॅपचा उपयोग इतर नागरिकांनाही करता येणार आहे. तातडीने पोलिसांची मदत मिळविण्यासाठी महिलांनी या अॅपचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
अॅप सहजरीत्या मोबाइलवरून डाऊनलोड करता येते. अँड्रॉइड सुविधा असणाऱ्या मोबाइलमध्ये या अॅपची सुविधा उपलब्ध आहे. गुगल सर्चमध्ये प्रतिसाद (आस्क) टाइप केल्यानंतर ते अॅप मोबाइलवर उपलब्ध होते. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर अॅपमध्ये कोड विचारला जाईल. त्याअनुसार अटी व शर्ती मान्य करून बटण क्लिक करायचे आहे. त्यानंतर संबंधित महिलेचे अॅपवर रजिस्ट्रेशन होईल.
अॅप डाऊनलोड झाल्यानंतर स्क्रीनवर लाल रंगाचा ‘सोशल एमर्जन्सी’ नावाचा आयकॉन येईल. जेव्हा अडचणीच्या वेळेत पोलिसांची गरज भासेल, तेव्हा आयकॉनवर क्लिक केल्यास पोलीस तत्काळ त्याच नंबरवर संपर्क साधतील. याकरिता पुणे शहर पोलिसांकडून या अॅपचा लाभ महिलांनी घ्यावा. (प्रतिनिधी)