कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:52 PM2018-06-07T13:52:41+5:302018-06-07T14:02:49+5:30
अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नागपूरमधील इंडियन असोसिएशन आॅफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे. अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात पहाटे ५ ते ७ दरम्यान सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला पहाटे हजर करण्यात आली असल्याची शक्यता आहे. तसेच इतर आरोपींना गुरुवारी दुपार पर्यत न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
शनिवारवाडा येथे कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत करण्यात आलेली चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप आहे. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलीस करण्यात येत आहे. त्याचं अनुषंगाने विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठातल्या प्राध्यापिका शोमा सेन, कमिटी फॉर द रिलीज आॅफ पॉलिटिकल्सचे जनसंपर्क सचिव रोना विल्सन आणि भारत जनआंदोलन संघटनेचे कार्यकर्ते महेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील अॅड उज्वला पवार यांनी युक्तिवाद केला की, अटक आरोपी हा सीपीआय या माओवादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्याकडून ८१कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्या कागदपत्रांत महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबतचे नकाशे मिळाले आहे. हे नकाशे सीपीआयला पुरविण्यात आले असल्याची शक्यता आहे.तसेच कोरेगाव भीमाबाबत देखील काही पुरावे मिळाले आहेत. त्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये एकूण १६ मुद्दे आहेत. त्या आधारे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. पवार यांनी केली होती. आरोपींच्या वतीने अॅड. मालवीय यांनी युक्तिवाद केला.