गुंड गज्या मारणेला पोलिस कोठडी; मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:39 IST2022-11-25T09:37:20+5:302022-11-25T09:39:19+5:30
न्यायालयाने त्यांना २९ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....

गुंड गज्या मारणेला पोलिस कोठडी; मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहातून घेतले ताब्यात
पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या ४ कोटींच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली होती. या मोक्काच्या गुन्ह्यात तपासासाठी पोलिसांनी आज कुख्यात गुंड गज्या मारणे व त्याच्या अन्य तीन साथीदारांना कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २९ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गज्या पंढरीनाथ मारणे (वय ५७, रा. शास्त्रीनगर, कोथरुड), मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४, रा. नर्हे), प्रसाद बापू खंडाळे (वय २९, रा. पद्मावती), मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. आंबेगाव पठार) अशी या चौघांची नावे आहेत.
अपहरण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना आज न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, गज्या मारणे सराईत गुन्हेगार असून संघटित टोळीप्रमुख आहे. तो दरवेळी वेगवेगळ्या साथीदारांसमवेत गुन्हे करतो. त्याच्या इशाऱ्यावरून हा गुन्हा झाला आहे. इतर तीन आरोपी कोणत्या उद्देशाने व कोणाच्या सांगण्यावरून गुन्ह्यात सहभागी झाले याचा तपास करायचा आहे. रुपेश मारणे याच्यासोबत जांभूळवाडी येथे आलेल्या आरोपीबाबत चौकशी करून त्यांना गुन्ह्यात अटक करायची आहे. मोनिका पवार हिने गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करायची आहे. मोनिका पवार हिने फिर्यादीकडून ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले आहे. ही रक्कम मोनिका हिला कोणी व कशासाठी घेण्यास सांगितली, याबाबत तपास करायचा आहे. तिचा व इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.