पोलीस कोठडीची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:11 AM2018-10-24T01:11:41+5:302018-10-24T01:11:43+5:30
राजगुरुनगर येथील सबजेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काल दोन आरोपींनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले.
- राजेंद्र मांजरे
दावडी : राजगुरुनगर येथील सबजेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काल दोन आरोपींनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. गज व खिडकीची जाळी कापेपर्यंत पोलीस झोपी गेले होते काय? अशा तर्क- वितर्काला तालुक्यात उधाण आले. त्यामुळे पोलिसांच्या कायदा- सुव्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तहसील कार्यालयालगत सबजेलची इमारत आहे. ही इमारत ब्रिटिशकालीन असून, तेव्हापासून आरोपींना येथे ठेवण्यात येते. या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शहराचा व या परिसरातील गावांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेक भांडणे, खून, मारामाऱ्या, चोरी, बलात्कार इ. घटना सर्रास घडतात. त्यामुळे कोठडी नेहमी आरोपींनी भरलेली असते. कुणीही यावे अन् पोलिसांना चिरीमिरी देऊन आरोपीला भेटावे. आरोपीला बाहेरचे खाण्यास आणून देणे, असे प्रकार येथे नेहमीच घडतात. आरोपींना तंबाखू, गुटखा, दारू पुरवणे असेही प्रकार येथे यापूर्वीही घडलेले आहेत. कस्टडीतील आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले गार्ड व पोलीस यांच्यावर वरिष्ठांचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की आरोपी पळाले तेव्हा आमचे गार्ड कर्मचारी जागे होते, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
>दोन दिवसांपूर्वी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २३, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत) या दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. कोठडीच्या पाठीमागील स्वच्छतागृहाच्या खिडकीचे लोखंडी गज बाहेरील व्यक्तीने कापून आरोपींना मदत केली. दरम्यान आमचे कर्मचारी जागे होते, असे पोलीस म्हणतात. त्या वेळी पोलिसांना काही आवाज का आला नाही, पोलीस गार्ड जिथे बसतात व आरोपी ज्या खिडकीवाटे पळाले ते अंतर फक्त १५ फुटांचे आहे.
>या सबजेल आरोपींना बाहेरील काही दिसू नये म्हणून बाहेरच्या बाजूने, व्हरांड्यातील आवाराच्या बाहेरच्या बाजूने शेडनेट-हिरवी जाळी लावण्यात आली. मात्र, आरोपींचे मित्र, नातेवाईक या शेडनेटची जाळी फाडून सबजेलमध्ये असण्याºया आरोपी व्यक्तीशी गप्पा मारतात. त्याला पोलीस गार्ड कुठलाही अटकाव करत नसल्याचे चित्र आहे.खेड पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक नवीन आले आहेत. तसेच अनेक कर्मचारी नवीन बदलून आले आहेत. त्यामुळे कोण काय करतोय, याचा काही मेळ बसत नाही. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक अवैध धंदे, मटका, जुगार सर्रास सुरूच आहेत. लॉजिंग तसेच गावागावांत काही ठिकाणी सुरू असलेल्या दारू हातभट्ट्याही नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याला मोठा हप्ता मिळतो, अशी चर्चा आहे. दोन पोलीस तर फक्त हप्ते गोळा करण्यातच मग्न असतात.