वकिलाला मारहाण करणा-या सहा जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:17 PM2018-03-24T22:17:00+5:302018-03-24T22:17:00+5:30
आमच्या कारला गाडी का घासली असे विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाइल, सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरली.
पुणे : कारला गाडी का घासली अशी विचारणा करीत वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अतुल मुरलीधर नाईक (वय-२२), गोकुळ कृष्णा निखाडे (वय २२), शुभम बाबुराव तायडे (वय-१९, तीघेही रा. भोसरी),आकाश महादेव काळपांडे (वय-२४, रा. दिघी), राजकुमार उमाजी डामसे (वय-२०, रा. हवेली) आणि जगदीश दिगंबर झंगळवाड (वय-१८, रा. खेड) अशी कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अॅड.राजेश किसन वाघ (वय-३४, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ हे २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या कारमधून जात असताना जुना-मुंबई हायवेवरील मीनाताई ठाकरे शाळेजवळ आले. त्यावेळी आरोपींनी चार चाकी आडवी लावून त्यांना थांबविले. त्यानंतर वाघ यांना कारच्या बाहेर खेचले व शिवीगाळ केली. तसेच आमच्या कारला गाडी का घासली असे विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाइल,सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरली. त्यामुळे याप्रकरणी वाघ यांनी भोसरी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी, तसेच आरोपींनी याप्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.