‘डीएसकें’च्या पत्नीकडून पोलिसांना जुजबी माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:45 AM2018-02-20T04:45:48+5:302018-02-20T04:45:56+5:30
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली़
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली़ या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली़
डी़ एस़ कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती़ त्याचवेळी त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची पोलीस कोठडी कायम आहे़ पोलिसांनी सोमवारी त्यांच्याकडे विविध माहिती विचारली़ मात्र, त्यावर त्यांनी जुजबी माहिती दिली़
डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती़ त्यांचा फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार डीएसकेंनी नावात छोटे बदल करून एकूण ५९ कंपन्या स्थापन केल्या व त्याद्वारे लोकांकडून ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे़
याशिवाय त्यांनी अनेकांकडून सुमारे ३५ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जेदेखील घेतली आहेत़ ठेवी व असुरक्षित कर्जे मिळून एकूण १ हजार १५३ कोटी रुपये त्यांनी स्वीकारले आहेत़
याशिवाय विविध बँकांची २ हजार ८९२ कोटींची कर्जे आहेत़ याशिवाय ज्या लोकांनी फ्लॅट बुक केले़ त्यांनी भरलेले पैसे व घेतलेली कर्जे यांची रक्कम वेगळी आहे़
न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही चौकशीसाठी पोलिसांकडे ४ दिवस हजेरी देण्यास सांगितले आहे़ त्यांनीही पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही़ शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे़