दारू तयार करण्यासाठी लागणारे 91 हजार लिटर रसायन पोलिसांनी केले उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:29 PM2024-02-09T12:29:08+5:302024-02-09T12:30:08+5:30
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पोलिसांची पुण्यातील अवैध व्यवसायावर करडी नजर
किरण शिंदे
पुणे: पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडाकेबाज कारवाई करून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे ९१ हजार लिटर रसायन उद्धवस्त केले आहे. या कारवाईत एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना लोणी काळभोर येथे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे याची माहिती मिळाली होती. या संदर्भात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत त्या ठिकाणी असलेल्या ७ मोठ्या लोखंडी टाकी मध्ये एकूण ९१,००० लिटर रसायन ज्याची किंमत ३६ लाख आहे असे रसायन जागीच नष्ट केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पोलिसांची अवैध व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे.
याप्रकरणी हातभट्टी मालक शंकर तानाजी धायगुडे ,शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांच्याविरुद्ध , महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम ६५ फ, भा.द.वी.कलम ३२८,३४ लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.