खुनी जोडप्याला अटक, ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:34 AM2017-11-29T02:34:04+5:302017-11-29T02:34:29+5:30
घरात कोंबड्या शिरल्या म्हणून झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नीच्या सांगण्यावरून एकाने शेजारी राहणा-या महिलेच्या तोंड व गळ्यावर कुºहाडीने वार करून तिचा खून करून दोघेही पती-पत्नी फरार झाले होते.
लोणी काळभोर : घरात कोंबड्या शिरल्या म्हणून झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नीच्या सांगण्यावरून एकाने शेजारी राहणा-या महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून तिचा खून करून दोघेही पती-पत्नी फरार झाले होते. या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी निलंगा तालुक्यातून अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल तुकाराम रणदिवे आणि रुक्मिणी अनिल रणदिवे अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर गोरख जाधव (वय २२, रा. आळंदी म्हातोबाची, कोळसकर वस्ती, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री साठेआठच्या सुमारास घटली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मृत नंदा या कामावरून घरी आल्या. त्यांना काही वेळाने त्यांच्या शेजारी रहात असलेल्या रूक्मिणी रणदिवे यांच्या भांडणाचा आवाज आल्याने ज्ञानेश्वर व त्यांची आई हे तेथे गेले असता रणदिवे यांच्या कोंबड्यांनी नंदा यांच्या झोपडीत घुसून गृहपयोगी साहित्याची पडझड केली होती.
या कारणांवरून दोघींमध्ये वाद चालला होता. थोड्या वेळाने दोघी शांत झाल्या व आपापल्या घरी गेल्या. रात्री सव्वाआठच्या सुमारास ज्ञानेश्वर जाधव हे आपल्या घरी असताना त्याच्या नंदा मावशी या मोठमोठ्याने ओरडून त्याला व त्याच्या वडिलांना अनिल मला मारायला आला आहे, असे सांगत होत्या. हे ऐकून जाधव कुटुंबीय पळत घराबाहेर आले. त्यावेळी नंदा या आपल्या
घराबाहेरील अंगणात उभ्या व त्यांचेसमवेत अनिल रणदिवे हा हातात कु-हाड घेऊन त्याच्या शेजारी पत्नी रूक्मिणी उभी असल्याचे त्यांना दिसले.
रूक्मिणीने अनिल रणदिवे याला नंदा या कोंबड्या वरून भांडण करत असल्याचे सांगत होत्या. यावेळी अनिल याने त्याच्या हातातील कु-हाडीने नंदा यांचेवर घाव घातला.यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
अनिल यांस पकडण्यासाठी जाधव कुटुंबीय व अंकुश लोंढे हे पुढे आले असता त्याने त्यांनाही
कु-हाडीने मारण्याची धमकी दिली. यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले होते.
अन्सारवाडा येथून अटक
माळी यांच्या खुन्यास पकडण्यासाठी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस हवालदार विशाल रासकर व नितीन सुद्रीक या पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी अगदी शिताफीने तपास करून अनिल तुकाराम रणदिवे यास व त्याची पत्नी रूक्मिणी या दोघांना अन्सारवाडा (ता. निलंगा, जि. लातूर ) येथे जेरबंद केले.