रुपाली ठोंबरे पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; राज्यपालांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:04 PM2022-12-02T14:04:31+5:302022-12-02T14:06:15+5:30
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर आहेत...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. यामुळे आता राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात आंदोलन केले. पोलिसांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना ताब्यात घेतले .
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून राज्यपालांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी आपण राज्यपालांना काळे झेंडे दाखवू, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला होता. त्यानुसार त्यांनी आपलं आंदोलन केलं. शिवाय संभाजीमहाराज छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनेही राज्यपालांना काळे झेंडे दाखवत पुण्यात निषेध व्यक्त केला.
आज राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, छत्रपतींवर बोलण्याचा राज्यपालांना कोणताही अधिकारी नाही. राज्यपालांनी आमच्यासमोर याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागावी.