भूत उतरविणाऱ्या मांत्रिकासह तीन महिलांना पोलीस कोठडी
By admin | Published: March 15, 2016 03:52 AM2016-03-15T03:52:33+5:302016-03-15T03:52:33+5:30
भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
पिंपरी : भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन महिला आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या तीन महिलांना देहूरोड पोलिसांनी घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोनी उमेश जेगरे (वय २६, रा. शिवाजीनगर, देहूरोड) या महिलेने मांत्रिकासह तीन आरोपी महिलांविरुद्ध रविवारी फिर्याद दाखल केली. दुसऱ्याच दिवशी सोमवारी देहूरोड पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडले. भीमप्पा शंकरप्पा कुंचीकर या मांत्रिकासह त्याला साथ देणाऱ्या नंदा खुडे (वय ५१), संगीता धनराज शिंदे (वय ४१), मीना प्रशांत कदम (वय ५५) या तीन महिलांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. अंधश्रद्धा बाळगून भूत उतरविण्यासाठी महिलेला मारहाण करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. देहूरोड परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर झोपडपट्टीतील मरिमाता मंदिरात तीन महिलांच्या मदतीने मांत्रिकाने सोनी जेगरे या महिलेला मारहाण केली. तिला भुताने झपाटले आहे, असे सांगून भूत उतरविण्यासाठी तिचे केस ओढले. डोळ्यांत, कानात, नाकात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळले. या अघोरी कृत्याविरोधात त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील काही बिल्डरांनी दौंड, कुरकुंभ येथे मांत्रिकाच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. त्या बिल्डरांना गुंगीचे औषध पाजून मांत्रिकाने शिष्यासह पलायन केले. १० मार्चला घडलेल्या या घटनेनंतर १४ मार्चला देहूरोडमध्ये घडलेल्या मांत्रिकाच्या मदतीने भूत उतरविण्याच्या या घटनेने या भागातील नागरिकांवर अद्यापही अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धेचे वाढते प्रकार
शहर परिसरामध्ये बुवाबाजीचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक लोकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर याला अशिक्षित नागरिकांबरोबर सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येऊनही संबंधित बुवांच्या विरोधात कोणतीही तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांत वाढच होत आहे. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.