पोलीस दिसला नाही की पळ सिग्नल तोडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:25+5:302021-02-24T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिवसेंदिवस शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जनजागृती मोहीम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसेंदिवस शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविली जाते. तरीही वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे दिसते. चौकात वाहतूक पोलीस नाही ना, याची खात्री करून पुणेकर सिग्नल तोडून जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले.
वाहतूककोंडी ही शहरात नित्याची बाब झाली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नसतील तर स्वेच्छेने नियम पाळणाऱ्या पुणेकरांची संख्या फार नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांच्या बेदरकारपणाचे दृष्य शहरात दिसते. सर्वसामान्यपणे वाहनचालकांनी किमान सर्व सिग्नल नीट पाळले तरी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी सुटू शकते. मात्र वाहनचालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळेच अपघात आणि वाहतूककोंडी वाढली आहे. यावर वाहनचालकांनीच नियम पाळावेत, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.
चौकट
वाहनचालक काय म्हणतात?
“मला तातडीने एका ठिकाणी पोहोचायचे होते. तिथे वेळेत पोहोचलो नाही तर माझे आर्थिक नुकसान होईल म्हणून सिग्नल पाळला नाही.”
-रमेश शिंदे
“इथे पोलीस पैसे खातात, राजकारणी लोक एवढा भ्रष्टाचार करतात, मग नियम पाळायचा ठेका काय आम्ही सामान्य नागरिकांनीच घेतला आहे का? आम्ही पण आमचा फायदा बघणार, आता पोलीस नव्हते म्हणून सिग्नल तोडला.”
-जतिन हविले
“माझ्या आईचे आज ऑपरेशन आहे. काही महत्त्वाची औषधं लगेच नेऊन द्यायची आहेत. त्यामुळे सिग्नल तोडावा लागला. अन्यथा एरवी मी नियम पाळतो.”
- अविनाश चौथाई
कोट
“पुणे वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरील वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांनी वाहतूक नियम पाळा आणि अपघात टाळा. पुणे वाहतूक पोलीस नेहमी नागरिकांच्या सेवेत आहेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.”-
राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक विभाग पुणे.
चौकट
रोज साडेपाचशे जणांवर कारवाई
पुणे वाहतूक पोलिसांकडून १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सिग्नल तोडणाऱ्या ३ हजार ५१९ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून ७ लाख ३ हजार ८०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. एका दिवसात ४०० ते ५५० लोकांवर कारवाई होते, तर ९० हजार ते १ लाख २० हजारच्या दरम्यान दंड वसूल केला जातो.