पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही; महिलेने थेट न्यायालयात अर्ज केला अन् बलात्काराचा गुन्हा दाखल झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:02 PM2021-08-04T19:02:32+5:302021-08-04T20:42:36+5:30
पुणे महानगपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल ; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी उचलले पाऊल
पुणे : एक लग्न झालेले असतानाही परिचारिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणा-या महापालिकेच्या वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फसवणुकीसंदर्भात यापूर्वी सिहंगड रस्ता आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही, असे तरूणीचे म्हणणे आहे.
तेव्हा नाईलाजास्तव तरूणीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात वकिलामार्फत तक्रार अर्ज दाखल केला आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाने स्वारगेट पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला.
डॉ. शशिकांत सोरटे (वय 39 रा.शिवाजीनगर गणेशखिंड) असे गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते 2021 दरम्यान घडला. तरूणीची आरोपी डॉक्टरशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक मागितला. दोघांमध्ये ओळख वाढत गेली. तो तिला मला तू खूप आवडतेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे वारंवार म्हणू लागला. तिला तो रूग्णालयाच्या रूममध्ये बोलावू लागला. तिच्याशी जबरदस्तीने त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आपण लग्न करणार आहोत असे सांगून त्याने शारीरिक संबंधावेळी त्यांचे व्हिडिओ काढले. एके दिवशी फोनवर बोलत असताना तिला मागून एका बाईचा आवाज आला त्यानंतर ती त्याच्या घरी जाऊन धडकली. तेव्हा त्याने माझे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले असून, मला 3 वर्षांचा मुलगा असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून कुठेही वाच्यता न करू नको असा तिच्यावर दबाव टाकला जात होता. तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करून, युपीएससीची परीक्षा झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
न्यायालयाने तिच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता अँड सिध्देश एस. घोडके यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अँड गोविंद शर्मा व अँड अभिषेक नागरगोजे यांनी सहकार्य केले.