ड्युटी २४ तास, पण १ तासही पाणी मिळेना ; पोलिसांच्या कुटुंबियांची खदखद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 08:41 PM2018-10-14T20:41:33+5:302018-10-14T20:43:29+5:30
पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे.
पुणे : समाजाचे प्रश्न मिटविण्यात पोलिसांची भूमिका ही अग्रस्थानी असते. सर्वत्र शांतता रहावी यासाठी पोलीस २४ तास कार्यरत असतात. मात्र याच पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती समाजासाठी २४ तास आॅन ड्युटी असतात. मात्र पुरेसे पाणी मिळावे, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खदखद आंदोलनकर्त्यां महिलांनी व्यक्त केली आहे.
ऐन नवरात्रोत्सवात पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या कुटंंबियांनी रास्ता रोको आंदोलन करावे लागले. तसेच येथील रहिवाशांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांच्या कुटुंबियांवर ही वेळ आल्याने घरातील व्यक्ती प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत असल्याची चित्र रविवारी वसाहतीमध्ये पहायला मिळाले. सध्या या ठिकाणी पोलिसांची सुमारे १ हजार कुटुंबिय वास्तव्यास आहेत. येथीस लोकसंख्या अडिच हजारांच्या घरात आहे. वसाहतीला रोज सकाळी ८ ते ९ तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याचा दाब अत्यंत कमी असतो. तर कधी-कधी तर २० मिनिट देखील पाणी सोडले जात नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रहिवाशी या समस्यांचा समाना करीत असून रविवारी त्यांचा संताप उसळला.
वसाहतीला पाणी पुरविण्यासाठी १६ लाख लिटरची टाकी उभारण्यात आली आहे. याच टाकीच्या शेजारी खड्डा करून २० लाख लिटरची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात लष्कर आणि एसएनडीटी जल केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. पुर्वी येथे केवळ एकच लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र पाच वर्षांपुर्वी दुसरी लाईन टाकण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणांहून योग्य दबावात पाणी सोडल्यानंतर खाली असलेली टाकी सुमारे ६ तासांत पुर्ण भरते. त्यानंतर हे पाणी वरील टाकीत सोडले जाते व तेथून वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र २० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या टाकीत दररोज १० लाख लिटर पाणी देखील सोडले जात नाही. त्यापुर्वीच पाणी थांबविण्यात येते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच पाण्याचा तुडवडा भासत आहे, अशी माहिती शेखर शेवाळे यांनी दिली. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकीजवळच्या केंद्रात तीन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी टाकीत आल्यानंतर त्यांचे पीडब्ल्युडीकडून वितरण केले जाते.
दोन हापश्यांवर भिस्त
तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने रविवाश्यांनी परिसरातून पाणी आणून दैनंदिन गरजा भागवल्या. याकाळात इमारत १०४ जवळ आणि हुतात्मा बालवीर शाळेजवळ असलेल्या हापशाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला. या दोन्ही हापश्यांवर नागरिकांची भिस्त होती. महिलांनी येथून डोक्यावर पाणी वाहून कुटुंबियांची तहाण भागविली.
मोटार पाच वर्षांपासून बंद
खालील टाकीत पाणी साचल्यानंतर दोन मोटारींच्या सहाय्याने उपसा करून पाणी मुख्य टाकीत सोडले जाते. मात्र त्यातील एक मोटार सुमारे तीन वर्षांपासून बंद आहे. त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप ती दुरुस्त किंवा बदलण्यात आलेली नाही.