नीरा गोळीबारातील मारेकऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:56+5:302021-07-19T04:08:56+5:30

नीरा (ता. पुरंदर) येथील कुविख्यात गुंड गणेश रासकर (वय ४०) यांच्यावर शुक्रवार (दि.१६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबार झाला ...

Police fail to catch the killer in the Nira shooting | नीरा गोळीबारातील मारेकऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश

नीरा गोळीबारातील मारेकऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश

Next

नीरा (ता. पुरंदर) येथील कुविख्यात गुंड गणेश रासकर (वय ४०) यांच्यावर शुक्रवार (दि.१६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबार झाला आणि नीरा शहरात एकच खळबळ उडाली. रहदारीच्या पालखी मार्गावर पोलीस स्टेशनपासून हाकेचे अंतर, एसटी बसस्थानक व रेल्वे स्टेशनच्या दरम्यान, चालू दुचाकीवर हा गोळीबार झाल्याने सुरुवातीला कोणाला काहीच कळाले नाही. फक्त फटाके फोडल्यासारखा आवाज झाल्याचे लोक सांगत होते.

नीरेत सतत दहशत माजवणारा व येरवडा कारागृहातून जामिनावर आलेल्या गुंड गणेश रासकर व त्याचा मित्र पल्सर दुचाकी (क्रमांक के. ए. ३५-आर. ६५२७) वरून नीरा शहरात फेरफटका मारताना लोकांनी पाहिले होते. गणेश दुचाकी चालवत होता, आधी हे दोघे छत्रपती शिवाजी चौकातून बसस्थानकाकडे गेले व काही वेळातच पुन्हा माघारी आले. दरम्यान, दुचाकी अंधार असलेल्या चिराग टी सेंटरसमोर येताच मागे बसलेल्या मारेकऱ्याने बेसावध असलेल्या गणेश रासकरच्या मानेच्या मागच्या भागात ए. गोळी झाडली. त्यामुळे दुचाकी विरुद्ध दिशेला आली व ती रासरकरसह दुसऱ्या ए. दुचाकीला (क्रमांक एम. एच. ११- बी. एफ. ९५८) आदळली. त्या दुचाकीवर रासकर रक्ताच्या थारोळ्या कोसळला. याच वेळी मागून दुसऱ्या एका मित्राची दुचाकी आली त्या दुचाकीवरून गणेश रासकरचा मेहुणा मागे बसला होता. गोळीबाराची घटना मेहुण्याने प्रत्यक्ष पाहिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गोळीबार झाल्यावर मेहुणा दुसऱ्या दुचाकीवरून उतरला हे पाहून गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्याने त्या दुचाकीवर बसून पुणे दिशेकडे फरार झाले.

नीरा शहरात पहिल्यांदाच असा गोळीबार झाल्याने लोक भयभीत झाले. घटनास्थळी गणेश रासकरचा मेहुणा असल्याने त्याने रिक्षातून रासकरला नीरा प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मृत झाला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राऊंडवर असलेले नीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी पांगवत परिस्थितीचे गांभीर्य ओळखत जोरदार सूत्र हलवली. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक घटनास्थळी आले. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व वरिष्ठांना कल्पना दिली होती.

घटनास्थळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, भोर - पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे अन्वेषण ग्रामीणचे प्रमुख पद्माकर घनवट टीमसह दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत नीरा दूरक्षेत्रात होते. शनिवारी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनसह इतरांनी पुरावे गोळा केले. परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ते पुरावे ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य व प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले वर्णनात साम्य असल्याचे सांगितले जात आहे.

गणेश रासकरचे जवळचे मित्र गौरव जगन्नाथ लकडे व निखिल रवींद्र ढावरे यांनी पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून केल्याचा अंदाज जेजुरी पोलिसांनी व्यक्त केला. हे दोघे संशयित गोळीबारानंतर दुचाकीवरून फरार झाले आहेत. त्यांची योग्य माहिती देणाऱ्यास नाव गुप्त ठेवत जेजुरी पोलीस बक्षीस देणार असून, लवकरच मारेकरी गजाआड असतील, असे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Police fail to catch the killer in the Nira shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.