'अपुन को कोई पकड नही सकता' म्हणत टिकटॉक केला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 08:03 PM2019-05-15T20:03:32+5:302019-05-15T20:18:02+5:30
: टिकटॉक व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्याचे फॅड शहरात वाढले आहे. हत्यार घेऊन ‘वाढीव दिसता राव’ वर टिकटॉक करणाऱ्या रहाटणीतील तरूणांवर कारवाई केल्यानंतर दुसरा गुन्हा नवी सांगवीत घडला आहे.
पिंपरी : टिकटॉक व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्याचे फॅड शहरात वाढले आहे. हत्यार घेऊन ‘वाढीव दिसता राव’ वर टिकटॉक करणाऱ्या रहाटणीतील तरूणांवर कारवाई केल्यानंतर दुसरा गुन्हा नवी सांगवीत घडला असून संजू चित्रपटातील ‘आपुनको कोई पकड नही सकता...’ यावरील टिकटॉक प्रकरणी दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
तरूणाईमध्ये व्हिडिओ तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची क्रेझ वाढली आहे. विविध चित्रपटांची गाणी, डायलॉग यांवर टिकटॉक व्हिडीओ तयार केला जातो. तरूणाईमध्ये याची क्रेझ वाढली आहे. यामुळे काय घडेल याचे भान तरूणाईला राहिलेले नाही. ‘वाढीव दिसता राव...’ या गाण्यावरील वाढीवपणा दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) यांना महागात पडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. व्हिडीओमध्ये वापरलेले हत्यार जप्त केले आहे. एक गुन्हा दाखल होतो ना होतो तोच दुसरा प्रकार सांगवीत घडला आहे.
या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. सांगवी परिसरात एका हुक्का पार्लरमध्ये चार तरूण असून हुक्का ओढत हातात धारदार शस्त्र घेऊन संजू चित्रपटातील संजय दत्त यांच्या डायलॉगवर आधारित ‘आपुनको कोई पकड नही सकता, टच भी नही कर सकता....’ या डायलॉगवर चार तरूण नाचतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत व्हिडीओ मध्ये नाचणाऱ्या अभिजित सातकर, शंकर बिराजदार, ओंकार कांबळे आणि जीवन रावडे नामक चोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी टिकटॉकवरील वाढीव पणा तरूणाईच्या अंगलट आला असून दहशत माजविणे, नागरिकांना भिती वाटेल असे व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर टाकू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अतिउत्साही तरूण येतील अडचणीत
वेगवेगळे व्हिडीओ टाकून ते सोशल मिडीयावर टाकणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने कारवाई सुरू केली आहे. अतिउत्साहीपणा तरूणांच्या अंगलट येऊ शकतो. खुलेआम दहशत माजविण्याचे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.