हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या ‘सविनय कायदेभंगा’ला पोलिसांचे दंडाने प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:39 PM2019-01-03T16:39:10+5:302019-01-03T17:01:08+5:30
समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना काही वेळातच हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपये दंड भरण्याचे एसएमएस आले.
पुणे : हेल्मेटसक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट न घालता रस्त्यावर उतरून ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करणाऱ्या हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीला पोलिसांनी दंडाने प्रत्युत्तर दिले आहे. समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना काही वेळातच हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपये दंड भरण्याचे एसएमएस आले. पण हा दंड न भरण्याची भुमिका समितीने घेतली आहे. तर पोलिसांनीही हेल्मेटबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
नवी पेठेतील पत्रकार भवन येथून सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची दुचाकी फेरी सुरू झाली. यावेळी वाहतुक पोलिसांचा फौजफाटाही हजर होता. याठिकाणी वाहतुक पोलिसांनी फेरीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकींची जागेवरच छायाचित्र घेतली. त्यामुळे तिथेच पोलिसांची भुमिका स्पष्ट झाली होती. सुमारे ५० ते ६० दुचाकी याठिकाणी होत्या. पोलिसांनी बहुतेकांची छायाचित्रे काढून लगेचच डिजिटल पावत्या करण्यास सुरूवात केली. तिथून ही फेरी पुढे गेल्यानंतर चौकांचौकांमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्येही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची छायाचित्रे घेण्यात आली. ही फेरी पोलिस आयुक्तालयाजवळ पोहचेपर्यंत काही जणांना ५०० रुपये दंडाचे ‘एसएमएस’ही आले होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक यांनाही दंडाचा ‘एसएमएस’ आला आहे. हा दंड न भरण्याची भुमिका त्यांनी घेतली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, पत्रकार भवनजवळ आलेल्या वाहतुक पोलिसांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस आयुक्तांनीही केवळ स्मितहास्य केले. माझ्यासह अनेकांना दंडाचे ‘एसएमएस’ आले आहेत. पण हेल्मेटसक्तीला आमचा विरोध आहे. त्यामुळे हा दंडही भरणार नाही. समितीतील अनेकांची हीच भुमिका आहे. याबाबत लवकरच समितीच्या बैठकीत पुढील दिशा ठरविली जाईल.
------------
न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. फेरीतील सहभागींवरही त्यानुसार कारवाई केली जाईल. चौकांमधील सीसीटीव्हीमध्ये आलेल्या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- तेजस्वी सातपुते
पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा
---------