वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा भर
By admin | Published: July 8, 2016 03:59 AM2016-07-08T03:59:28+5:302016-07-08T03:59:28+5:30
वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाचेच काम करावे, गर्दीच्या वेळी दंड, पावत्या करण्याऐवजी वाहतूक सुरळीत कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, वॉर्डनने वाहने अडवू नये, कामकाजात कसलाही हस्तक्षेप
पिंपरी : वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाचेच काम करावे, गर्दीच्या वेळी दंड, पावत्या करण्याऐवजी वाहतूक सुरळीत कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, वॉर्डनने वाहने अडवू नये, कामकाजात कसलाही हस्तक्षेप करू नये, वाहने अडविणे अथवा दंड करणे आदी कामे केवळ पोलीस कर्मचाऱ्यानेच करावीत, अशा स्पष्ट सूचना वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांची संख्याही वाढत आहे. तर शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाऐवजी गप्पा मारत बसतात. तर काही पोलीस दंडाच्या पावत्या न फाडता दंडाची आकारणी करीत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणली. या वृत्ताची शहरात जोरदार चर्चा झाली. दरम्यान, या स्टिंग आॅपरेशनची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
याबाबत राजेंद्र भामरे म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील मुख्य चौकांसह ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केवळ वाहतूक नियमनालाच प्राधान्य दिले जावे, याबाबतही सूचना दिल्या आहेत. रस्त्याने जाताना वाहनचालकाला कुठलाही त्रास होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. ट्रॅफिक वॉर्डनला केवळ सहायक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी वाहन अडवू नये, अथवा दंडाची मागणी करू नये, याबाबत सर्व वाहतूक विभागांना कळविण्यात आले आहे. असे गैरप्रकार घडल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे भामरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी कारवाईऐवजी वाहतूक नियमनाकडे लक्ष द्यावे. कुणीही एकत्रित उभे न राहू नये. वॉर्डनने वाहने अडवू नये, वाहने अडविणे अथवा दंड ही कामे पोलीस कर्मचाऱ्यानेच करावीत. वाहनचालक कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचावा, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, या सूचना देण्यात आल्या आहेत.
- राजेंद्र भामरे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग