पोलीस दलाला कर्मचाऱ्यानेच गंडविले
By admin | Published: May 14, 2016 12:35 AM2016-05-14T00:35:44+5:302016-05-14T00:35:44+5:30
पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गेले आठ महिने स्वत:ची हजेरी लावून कामावर न जाताच पगार लाटल्याचे समोर आले आहे.
लक्ष्मण मोरे, पुणे
पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गेले आठ महिने स्वत:ची हजेरी लावून कामावर न जाताच पगार लाटल्याचे समोर आले आहे. परिमंडल तीनच्या उपायुक्तांकडे ‘आॅर्डर्ली’ म्हणून नेमणूक झालेला हा कर्मचारी तिकडे हजरच झाला नाही. मात्र, मुख्यालयात चिरीमिरी देऊन स्वत:ची हजेरी लावणाऱ्या या कर्मचाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे. त्याच्या विभागीय चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यालयातील काही कनिष्ठ अधिकाऱ्यांचे हात ओले करून हजेरी लावून महिनोन्महिने गायब राहण्याचे प्रमाण वाढत चालले असून, याच्याही चौकशीही आवश्यकता निर्माण झाली आहे.
दत्तात्रय धुमाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळ यांची नेमणूक मुख्यालयामध्ये होती. त्यांना परिमंडल तीनच्या उपायुक्तांकडे ‘आॅर्डर्ली’ म्हणून नेमण्यात आले होते. परंतु धुमाळ तिकडे हजरच झाले नाही. मुख्यालयात मात्र दररोज हजेरी लावून उपायुक्तांकडे जात असल्याचे ते सांगत होते. उपायुक्त कार्यालयाला आपल्याला अद्याप मुख्यालयातून सोडले नसल्याचे धुमाळ सांगत होते. गेले आठ महिने मुख्यालय आणि उपायुक्त कार्यालयाला भूलथापा देत त्यांनी काम न करताच दरमहा पगार लाटला. याबाबत परिमंडल तीनच्या उपायुक्तांनी आपल्याला याबाबत काही माहितीच नसल्याचे सांगितले. वास्तविक हा कर्मचारी तिकडे हजर झाला नाही ही बाब त्यांच्या कार्यालयाने मुख्यालयाला कळवणे अपेक्षित होते. त्यासोबतच नेमणूक दिलेले कर्मचारी नेमके जातात कोठे हे पाहण्याची जबाबदारीही मुख्यालयाची आहे. ही बाब लक्षात यायला तब्बल सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गेला. यासंदर्भात धुमाळ यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी सुरुवातीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. परंतु परिमंडल तीनच्या कार्यालयातून माहिती मागवल्यानंतर त्यांचे पितळ उघडे पडले.
धुमाळ यांची सहा ते सात महिन्यांचा पगार उचलला आहे. पितळ उघडे पडल्यानंतर तीन महिन्यांपासून त्यांची सेवा बिनपगारी करण्यात आली आहे. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पगारामधून काम न केलेल्या सात महिन्यांच्या पगाराची कपातही केली जाणार आहे. त्यांची दोनच दिवसांपूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेण्यात आली आहे.
जनतेची सेवा करण्यासाठी पोलीस दलात भरती झालेले काही कर्मचारी पोलीस दलालाच टोपी घालत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेकायदेशीर धंद्यांना अभय देणाऱ्या तसेच बेकायदा मटक्याचा धंदा चालवणाऱ्या अशा तीन पोलिसांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी निलंबित केले होते. दोनच दिवसांपूर्वी आयुक्त शुक्ला यांनी तरुणीची विनयभंगाची तक्रार दाखल न करुन घेणाऱ्या उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एकीकडे पोलीस आयुक्त शहर पोलीस दलाची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही कर्मचारी अधिकारांचा गैरफायदा उचलत आहेत.