डॉक्टरास मारहाण केल्याप्रकरणी पोलीसास अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:15+5:302021-06-03T04:08:15+5:30
पुणे : बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड ...
पुणे : बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यास हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला.
बाणेर येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरास वारंवार ‘कॉल’ करून देखील रुग्णाची माहिती न दिल्याने सागर गायकवाड याने डॉक्टरांशी हुज्जत घातल्याची तक्रार तेथील डॉक्टर अजयश्री अधिकराव मस्कर यांनी चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन येथे केली होती. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनला देखील डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांच्याशी हुज्जत घातल्याचा आरोप करत सागर सिद्धेश्वर गायकवाड व सचिन सिद्धेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
परंतु, आरोप मान्य नसल्याने पोलीस कर्मचारी सचिन सिद्धेश्वर गायकवाड यांनी तत्काळ त्यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावेळी फिर्यादी हे शासकीय कर्मचारी नसून ते योग्य कामकाज करत नसल्याने जाब विचारल्याचा राग मनात धरून तब्बल सात तासांचा उशीर करून गायकवाड बंधूंवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे त्यांचे वकील ॲड. ठोंबरे यांनी केला. आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद मान्य करत पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यास हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. अभिजित सोलनकर यांनी कामकाज पाहिले.