खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:23+5:302021-05-15T04:11:23+5:30
पुणे : एका व्यक्तीला ऑफिसमधून मारहाण करीत खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चार आरोपींना चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा गुन्हा दाखल ...
पुणे : एका व्यक्तीला ऑफिसमधून मारहाण करीत खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चार आरोपींना चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा गुन्हा दाखल झाल्यापासून ३६ तासांच्या आत उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले.
मोहित हेमंत वेदपाठक (वय ३२, रा. गुलमोहर सोसा. खराडी. मूळगाव ता. लोहा, जि. नांदेड), अक्षय दिलीप गिरीगोसावी (वय २७, रा. ११३, मोजेवाडा, येरवडा), मारूती नंदू पवार (वय ३४, रा. मु. पो. माले, ता. मुळशी) आणि नरहरी मोतीराम भावेकर (वय ३१, रा. वळणे सोनारवाडी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये १० मे रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास फिर्यादी यांना आरोपी मोहित वेदपाठक व त्याच्या इतर ३ साथीदारांनी क्रिस्टल एम्पायर, बाणेर पुणे येथील ऑफिसमध्ये मारहाण करुन त्यांच्याच कारमध्ये जबदस्तीने बसवून सूस येथे नेले. त्यानंतर तोंड, हात, पाय बांधून मुळशी तालुक्याच्या परिसरात शेतामध्ये घेऊन जात एका टेंटमध्ये बांधून ठेवले तसेच फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचेकडील मोबाईल, अंगठी घड्याळ व एटीएम काढून घेतले व १५ लाख रुपये खंडणी मागितली. फिर्यादीने त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढून आणून देण्याची तयारी दाखविल्यानंतर त्यांना दोन दिवसांनी सूस गाव येथे सोडून दिले. त्यांनतर फिर्यादी यांनी या घटनेबाबत चतु:शृंगी पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दादा गायकवाड, यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी व पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांचे नेतृत्वाखाली दोन टीम तयार केल्या .या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू केला. गुन्ह्यातील आरोपी मोहित वेदपाठक व त्याचे साथीदार हे मुळशी परिसरात असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून काढून घेतलेला मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी हे करीत आहेत.