सोशल मीडियावर हातात तलवार, कोयते घेऊन फोटो पोस्ट करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:18 AM2022-04-27T11:18:58+5:302022-04-27T11:21:18+5:30
गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली
पिंपरी : सोशल मीडियावरून दहशत पसरविण्याचे प्रकार सुरू आहेत. अशाच प्रकारे सोशल मीडियावर घातक शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत पसरविल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६ कोयते (पालघन) आणि २ तलवारी जप्त केल्या. गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे (वय २१, रा. जाधववाडी, चिखली), ओंकार उर्फ प्रशांत ठाकूर (वय १८, रा. माळवाडी, सोळू, खेड) आणि अक्षय देविदास चव्हाण (वय २३, रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परिसरात दहशत पसरवण्यासाठी सोशल मीडियावर हातात तलवार, कोयते घेऊन फोटो पोस्ट करीत होते. याबाबत गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी आरोपींचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ शोधून काढले.
दरम्यान, या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असणारी हत्यारे देखील पोलीसांनी जप्त केली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुंडा विरोधी पथकाने आठ घातक हत्यारे जप्त केली.