निनावी तक्रारींमुळे पोलीस हैराण

By admin | Published: November 18, 2015 03:54 AM2015-11-18T03:54:50+5:302015-11-18T03:54:50+5:30

निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही

Police harasses due to anonymous complaints | निनावी तक्रारींमुळे पोलीस हैराण

निनावी तक्रारींमुळे पोलीस हैराण

Next

पुणे : निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही कामगिरी खालावत चालली आहे. निनावी आणि खोट्या तक्रारी, खोट्या सहीने केलेल्या तक्रारी आल्यास त्यावर कार्यवाही न करता असे अर्ज दफ्तरी दाखल करण्यात यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र छळवणुकीसाठी या अर्जांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.

पोलीस दलामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘नेटवर्क’ला मोठे महत्त्व आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अधिकारी सोडले तर अन्य शहर व जिल्ह्यांमधून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वत:चे नेटवर्क तयार झालेले नसते. खबऱ्यांचे जाळे अधिक घट्ट असल्यास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. पोलिसांचे कान आणि डोळे म्हणजे त्यांचे खबरे. खबऱ्यांशी संपर्क ठेवून माहिती काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यासाठी वरिष्ठांची व सहकारी कर्मचाऱ्यांची नाराजी सोसावी लागते. गुणवत्तेच्या आधारे कामामध्ये आघाडी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र अलीकडच्या काळात निनावी अर्जांद्वारे त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. त्यामुळे काम करणारे कर्मचारीही शांत झाले आहेत.
ज्या तक्रारींमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमूद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, अशा तक्रारी दफ्तरी दाखल करून घ्याव्यात. असंबद्ध आरोप असणाऱ्या तक्रारींची तपासणी करण्यात येऊ नये. ज्या तक्रारींमध्ये पडताळणी करता येऊ शकेल असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारींच्या संबंधात प्रशासकीय विभाग अथवा मंत्रालयाने दखल घ्यावी. ही तक्रार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घ्यावी. तक्रारदाराकडून १५ दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास स्मरणपत्र पाठवून आणखी १५ दिवस प्रतीक्षा केल्यानंतरही जर प्रतिसाद न मिळाल्यास ही तक्रार खोट्या नावाने केल्याचे नमूद करावे, असे आदेशात म्हटले आहे.
अशा सर्वच अर्जांबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नसून, पडताळणी समर्थनास उपयुक्त अशा प्रसंग अथवा चौकशीयोग्य मुद्यांचा उल्लेख असेल आणि हे मुद्दे सार्वजनिकदृष्ट्या पुरेसे महत्त्वाचे असतील तरच चौकशी करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे.

पदोन्नतीच्या काळात असे प्रकार : खात्यांतर्गत स्पर्धेमुळेही प्रकार
प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने निनावी किंवा खोट्या नावाने तक्रारी नाराज झालेल्या व्यक्तींकडून केल्या जातात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याच्या दरम्यान निनावी व खोट्या नावाने तक्रारी केल्या जातात. परिणामी त्यांना पदोन्नती मिळणे अडचणीचे ठरते. यासोबतच त्यांच्या नीतिमूल्यांचे खच्चीकरण केले जाते.
असे निनावी अर्ज करणाऱ्याने खरेपणाबद्दलची सही केली पाहिजे. सही येत नसल्यास त्याने अंगठ्याचा ठसा उमटवला पाहिजे, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही खात्यांतर्गत स्पर्धेमधून निनावी व खोटे अर्ज करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

Web Title: Police harasses due to anonymous complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.