पोलीस मित्रांची आग विझविण्यासाठी झाली मोठी मदत
By admin | Published: December 17, 2015 02:21 AM2015-12-17T02:21:59+5:302015-12-17T02:21:59+5:30
कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीमधील गाद्यांच्या कारखान्याला तसेच मयुरेश डायनिंग हॉलला लागलेल्या आगीमध्ये चार निष्पाप कामगारांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
पुणे : कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीमधील गाद्यांच्या कारखान्याला तसेच मयुरेश डायनिंग हॉलला लागलेल्या आगीमध्ये चार निष्पाप कामगारांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या आगीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दल व पोलिसांना ‘पोलीस मित्रांची’ मोठी मदत झाली. कोथरुड पोलीस ठाण्यासोबत काम करणाऱ्या २५ पोलीसमित्रांचा गट तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तसेच त्यांनी तातडीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करून आणखी मदत मागवली.
पोलीसमित्र मयूर नेवासे यांनी सांगितले, की जेव्हा आगीची माहिती मिळाली तेव्हा आम्ही तातडीने भुसारी कॉलनीमध्ये पोहोचलो. तेथे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. नागरिकांना तसेच बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे आम्ही तातडीने पौड रस्ता, घटनास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर स्वयंसेवक नियुक्त केले. लक्ष्मण धुती यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर वेड्यावाकड्या पद्धतीने लावण्यात आलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांची वाहने जायला अडचण निर्माण होत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आमचे सर्व स्वयंसेवक व पोलीसमित्र रस्त्यांवर उभे राहून वाहतूक नियमन करीत होते. तसेच आपत्कालीन मदतीसाठी वाहनांना वाट मोकळी करून देत होते. मात्र काही नागरिक घटनेचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅप टाकण्यासाठी धडपडत होते, असे धुती म्हणाले. पोलीस हवालदार बी. एच. चव्हाण हे कोथरुड पोलीस ठाण्याच्या पोलीसमित्रांचे समन्वयक म्हणून काम करतात. या सर्व पोलीसमित्रांनी मोठी मदत केली असून त्यामुळे बचावकार्य सुरळीत झाले. पोलिसांना त्यांनी गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियमन करून सहकार्य केले. हातातील सर्व कामे सोडून पोलीसमित्र मदतीला धावल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच नागरी वस्तीला धोका
मयुरेश डायनिंंग हॉलच्या बेकायदेशीर वापराबाबत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला वारंवार तक्रारी केल्यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे या व्यावसायिकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या व्यावसायिकांकडे असलेल्या सिलिंडरच्या टाक्याही यामध्ये सापडल्यामुळेही आग विझविण्यास विलंब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगा
भुसारी कॉलनीतील गादीच्या गोडावूनला लागलेल्या आगीमुळे मुख्य बाह्यवळण महामार्गाबरोबरच नळस्टॉप ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूककोंडीचा ताण आला होता, तर कोथरूड डेपो परिसरात लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे बचावकार्यालाही विलंब लागला. कोथरूड वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे दोन तासांत वाहतूक पूर्वपदावर आली.