पोलिसांनी मिळवून दिला ज्येष्ठ नागरिकास सदनिकेचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:57 PM2018-12-18T14:57:41+5:302018-12-18T15:00:17+5:30
दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे.
पुणे : जुन्या सहकारी गृहरचना संस्थेच्या पूर्नविकासाचे काम आता अनेक सोसायट्या घेऊ लागल्या आहेत. पण काही वेळा बांधकाम व्यवसायिक ताबा घेताना अनेक आश्वासने देतात, एकदा जागा ताब्यात आली की मुळ घरमालकांना करारप्रमाणे जागा देण्याचे टाळतात. त्यात ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना अधिकच त्रास होतो. दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे. अनेकदा पोलीस ठाण्यात अशा तक्रारी घेऊन गेल्यावर पोलीस त्या कागदांना हातही लावत नाही. ही दिवाणी बाब आहे, तुम्ही न्यायालयात जा असे सांगून हात झटकून टाकतात. दत्तवाडी पोलिसांचा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनी घेतल्यास असंख्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
रविकुमार सदाशिव भावे (वय ६७, रा़ बल्लाळ सोसायटी, पद्मावती, सहकारनगर) हे राहत असलेल्या सहकारी गृह संस्थेच्या पुर्नविकासाचा हक्क एका बांधकाम व्यावसायिकाला दिला होता. त्यांचा करार २०१४ मध्ये होऊन आॅक्टोंबर २०१७ ला रवीकुमार यांना सदनिका देणे अपेक्षित होते. पण, त्यांनी वर्ष उलटल्यानंतरही ताबा दिला नाही. भावे यांनी महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार नोंदविली. ही तक्रार दत्तवाडी पोलिसांना १८ नोव्हेंबर २०१८ ला मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी देवीदास घेवारे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांना तक्रारदारांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघा संबंधितांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणला.
बांधकाम व्यावसायिकाने दोन आठवड्यात भावे यांच्या सदनिकेची रंगरंगोटी आणि राहिलेली इतर छोटी मोठी कामे करुन दिली व भावे यांना सदनिकेचा ताबा दिला. बांधकाम व्यावसायिकांनी अंतर्गत सोयी सुविधा देण्याचे कबुल केल्यामुळे भावे यांनी सर्वात प्रथम ७ लाख रुपये देण्याचे ठरले होते. पंरतु भावे यांच्याकडून ९ लाख रुपये घेतले. तरीसुद्धा त्यांना ताबा मिळाला नव्हता. बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिना १६ हजार ५०० रुपये भाडे भावे यांना द्यायचे कबल करुनसुद्धा एप्रिल २०१६ पासून ती रक्कम देण्यात आली नाही. ती रक्कम तडजोडीमध्ये बांधकाम व्यावसायिक यांनी एकूण सव्वा लाख रुपये व पाच हजार रुपये वाहतूकीचे भाडे म्हणून दिले आहे.