लाच स्वीकारताना कामशेतचे पोलीस निरीक्षक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:12 AM2021-03-07T04:12:02+5:302021-03-07T04:12:02+5:30
कामशेत : न्यायालयीन कोठडीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना जामीन करण्यासाठी ५ लाखांच्या ...
कामशेत : न्यायालयीन कोठडीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना जामीन करण्यासाठी ५ लाखांच्या लाचेची मागणी करणारे कामशेत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना शनिवारी रंगेहाथ पकडले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना २१ फेब्रुवारी रोजी गोवित्री संस्थेतील बनावट मतदारयादीत फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.
त्यांना न्यायालयात जामिनाबाबत मदत करण्यासाठी आरोपींनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी आरोपींनी अडीच लाख रुपये घेतले. मात्र, २५ फेब्रुवारीला न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत झाली नाही. त्यामुळे नेवाळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने तक्रारदार व मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी उर्वरित रक्कम देण्याचे टाळले.
दरम्यान, बाळासाहेब नेवाळे यांना १० मार्चला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे म्हणून आरोपींनी उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदारांकडे केली.
त्यावर तक्रारदार शेवाळे यांनी ही माहिती पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार सापळा रचून शनिवारी दुपारी तीन वाजता रोख एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांची पाच तास चौकशी सुरू होती. आरोपींवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या पथकाने ही कारवाई केली.