उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:24 PM2017-12-25T15:24:20+5:302017-12-25T15:31:59+5:30
धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले.
पुणे : उपचारांसाठी पुण्यामध्ये आलेल्या बारामतीच्या नागरिकाचे प्राण पुणे लोहमार्ग पोलिसांनी वाचविले. धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास रेल्वे स्थानकावर घडली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव येवले (रा. बारामती) हे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यात आले. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पिंपरीला जायचे होते. त्यामुळे ते पुणे रेल्वे स्थानकांवर आलेले होते. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि कर्मचारी सचिन राठोड फलाट क्रमांक एकवर पायी गस्त घालीत होते. दरम्यान, फलाट क्रमांक एकवर दौंडवरुन आलेली डीएमयू आली.
ही गाडी फलाटावर लागली असतानाच येवले गाडीमध्ये चढले. ही गाडी लोणावळा येथे जात असल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र, ही गाडी यार्डामध्ये जात असल्याचे समजताच येवले यांनी घाईघाईत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. गाडीने वेग घेतलेला असल्याने येवले यांचा तोल गेला. त्यांचा पाय फलाटावर पडण्याऐवजी गाडी आणि फलाटाच्यामधील मोकळ्या जागेत पडला. हे दृश्य पायी गस्त घालीत असलेल्या निरीक्षक खंडाळे यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ येवले यांच्याकडे धाव घेतली. कर्मचारी राठोड यांच्या मदतीने येवले यांना बाहेर खेचत त्यांचे प्राण वाचविले. येवले यांनी आपले प्राण वाचविल्याबद्दल पोलिसांचे आभार व्यक्त केले.