फोन टॅपिंग प्रकरणात बड्या राजकीय व्यक्तीकडे पोलिसांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:20 PM2022-03-12T13:20:24+5:302022-03-12T13:20:35+5:30
एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते
पुणे : विधानसभेत ‘पेन ड्राईव्ह’ प्रकरण गाजत असताना पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयात काल एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा त्यांचाच आहे का याची खातरजमा करण्यासाठी या व्यक्तीला बोलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने ६० दिवस फोन टॅपिंग केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला होता. राज्य शासनाच्या अहवालानुसार पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्यक्तीच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यात आले असून प्रत्यक्ष रेकॉर्डिंग आणि हे सॅम्पल जुळते का याची तपासणी करण्यात येणार आहे. अशाच प्रकार इतर राजकीय व्यक्तींचे आवाजाचे नमूने घेण्यात येणार आहे. हे सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर व हे नमुने आणि रेकॉर्डिंगमधील आवाज जुळल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे.