पोलिसांना वाहतुकीचे नियम मोडल्याचा दंड आहे का? पुणेकराचा शाखा उपायुक्तांना पत्रातून सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:01 PM2022-02-08T15:01:28+5:302022-02-08T15:01:37+5:30
गणवेशात असलेले अनेक पोलीस दुचाकी चालवताना हेल्मेट वापरत नाहीत तसेच चारचाकी वाहन चालवत असलेल्या पोलिसांनी बेल्ट लावलेला नसतो
पुणे : पुणेकर नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून एका वर्षात कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावणाऱ्या वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना एका पुणेकर नागरिकाने पत्र पाठवून अडचणीत आणणारा प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्ही दंड करता पण, तुमच्या वाहतूक शाखेचे अनेक पोलीस विनाहेल्मेट व कितीदा तरी नियम मोडून वाहन चालवतात, त्यांची तपासणी करणारी व त्यांना दंड ठोकणारी काही यंत्रणा तुमच्याकडे आहे का? असा तो प्रश्न आहे.
अनेक वर्षे कामगार चळवळीत काम करणारे सूर्यकांत उर्फ मामा परांजपे यांनी वाहतूक उपायुक्तांना याबाबत लिहिले आहे. गणवेशात असलेले अनेक पोलीस दुचाकी चालवताना हेल्मेट वापरत नाहीत. चारचाकी वाहन चालवत असलेल्या पोलिसांनी बेल्ट लावलेला नसतो. वाहन चालवताना पोलिसांकडे त्यांच्या वाहनांची सर्व कागदपत्रे तसेच वाहन चालवण्याचा परवाना आहे असेच गृहीत धरलेले असते. प्रत्यक्षात तसे ते नसते. त्यांची तपासणी करणारी व नियम मोडला म्हणून त्यांना दंड करणारी यंत्रणा अस्तित्वात आहे का असा प्रश्न त्यांनी केला आहे.
नागरिकांना दंडाची पावती पाठवताना त्याबरोबर सीसीटीव्ही फुटेजमधून घेतलेले छायाचित्र पाठवले जाते. नियम मोडणारे किती पोलीस वाहनचालक या यंत्रणेने पकडले आहेत व त्यांना दंड करण्यात आला आहे त्याची माहितीही परांजपे यांनी मागविली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही परांजपे यांनी पत्राच्या प्रती पाठविल्या आहेत.
...म्हणून मनात आले
परांजपे म्हणाले, एका वर्षात वाहतूक शाखेकडून काही लाख नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा दंड हे २३ जानेवारीच्या ‘लोकमत’मधील वृत्त वाचले. त्यावेळी पोलिसांच्या बेशिस्तपणाचे काय, त्यांना कोण दंड करते हा प्रश्न मनात आला. त्यांनी कसेही वागायचे व बाकीच्यांना मात्र नियम मोडले म्हणून दंड करायचा हे योग्य नाही असे वाटले म्हणून हे पत्र पाठविले आहे. त्याला उत्तर मिळावे असे अपेक्षित आहे.