बारामती शहरात कोविड रुग्णालयांवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:49+5:302021-04-21T04:09:49+5:30
पोलिसांची नजर भरारी पथकाने अचानक भेटी देत केली तपासणी बारामती : बारामती शहरात आता कोविड रुग्णालयांवर पोलिसांची नजर ...
पोलिसांची नजर
भरारी पथकाने अचानक भेटी देत
केली तपासणी
बारामती : बारामती शहरात आता कोविड रुग्णालयांवर पोलिसांची नजर राहणार आहे. सोमवारी (दि. १९) भरारी पथकाने अचानक भेटी देत संबंधित रुग्णालयांची तपासणी केली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी माहिती दिली.
बारामतीमध्ये कोविड रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा तपासण्यासाठी या भेटी देण्यात आल्या. भरारी पथकामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, तालुक वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांचा समावेश आहे. या पथकाने कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या बारामती हॉस्पिटलला अचानकपणे भेट देत पाहणी केली.
दोन दिवसांपूर्वी जगन्नाथ हॉस्पिटल व देशपांडे हॉस्पिटल यांना भेटी देण्यात आल्या होत्या. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा, उपचारपद्धती, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड, ऑक्सिजन-व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी-पुरवठा, टास्क फोर्सने दिलेली नियमावली, रुग्णांचे होणारे बिल या सर्व गोष्टीचे पालन होत आहे का? याबाबत तपासणी करण्यात आली. या वेळी रुग्णांना चांगली सुविधा देण्यात येत असल्याचे आढळले. रुग्णांच्या नातेवाइकांकडे देखील पथकाने हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चर्चा केली. या वेळी नातेवाइकांनी कोणतीही तक्रार व्यक्त न करता त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, रुग्णांच्या काळजीने तणावात असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. या नातेवाइकांना पोलिसांनी ही परिस्थिती निघून जाईल. सर्व काही ठीक होईल, असा विश्वास दिल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.
पोलिसांनी या वेळी डॉक्टर, नर्सेस, स्टाफ यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यावर असणाऱ्या अतिरिक्त ताणाबाबत ऐकून घेऊन ते करत असलेले कार्य श्रेष्ठ आहे. अजून काही दिवस आपणाला अशीच चांगली सेवा द्यायची आहे. आपले काम अतिशय उत्तम असल्याचे सांगत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही किरकोळ स्वरूपात कागदोपत्री पाठवण्यात येणारी माहिती याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जास्तीत जास्त कोविड रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयांवर पथकाची नजर राहणार आहे. या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये हलगर्जीपणा करणारे, रुग्णांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिरगावकर यांनी दिला आहे.
बारामतीत भरारी पथकाने रुग्णालयांना भेटी देत अचानक तपासणी केली.
२००४२०२१ बारामती—०२